पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टमध्ये पक्षनेत्यांना स्थान नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 06:03 PM2020-08-24T18:03:55+5:302020-08-24T18:15:59+5:30
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेला ट्रस्ट स्थापन..
पुणे : महापालिकेच्या महत्वाकांक्षी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेला ट्रस्ट स्थापन करण्यात आला असून त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही नोंदणी करताना पक्षनेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. सत्ताधारी पदाधिकारी, विरोधी पक्षनेत्या आणि पालिकेचे अतिवरीष्ठ अधिकारी यांचा ट्रस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.
हे वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष साकारण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मान्यतेचा अर्ज गेल्या आठवड्यात मुंबईत वैद्यकीय शिक्षक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, नाशिक या संस्थेकडेही हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाची प्रक्रिया निर्णायक स्थितीमध्ये आली असून गुजरातमधील अहमदाबाद महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर पुणे महापालिकेचा न्यास (ट्रस्ट) स्थापन करण्यास पालिकेच्या मुख्यसभेने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे.
या न्यासाच्या माध्यमातून महाविद्यालय उभे करण्याचा ठराव स्थायी समितीसह मुख्य सभेत मंजूर झालेला आहे. राज्य शासनानेही त्याला मान्यता दिलेली आहे. धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून न्यास नोंदणी करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा 'मास्टर प्लॅन' तयार करण्यात आला असून त्याला पालिकेच्या बांधकाम विभागाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआयची मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तत्पूर्वी डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स, नाशिक यांच्याकडून एक पथक पाहणीसाठी पुण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर केंद्राकडे हा प्रकल्प पाठविला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआयची मान्यता झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळणार आहे.
ट्रस्ट स्थापन करून हे महाविद्यालय उभे करण्यास महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिलेली आहे. परंतु, या ट्रस्टमध्ये विरोधी पक्षनेते यांच्यासह पालिकेतील सर्व पक्षनेत्यांचा समावेश करून घेण्याची उपसूचना देण्यात आली होती. परंतु, हा न्यास धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करताना पक्षनेत्यांना समाविष्ठ करून घेण्यात आलेले नाही.
-----------------
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्या, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख यांची न्यासाचे सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. परंतु, पालिकेतील काँग्रेस, शिवसेना, मनसे, एमआयएम या पक्षांच्या पक्षनेत्यांची मात्र सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आलेली नाही. या नेत्यांचा समावेश करण्यासाठी मंगळवारी जाणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.