बारामती (पुणे) : पक्ष, चिन्ह, झेंडा सर्व काही चोरी झाली. ही किरकोळ नाही, तर होलसेल चोरी झाली. सगळ्या देशाला माहिती आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणी स्थापन केला. जे लोक पक्ष, चिन्ह घेऊन गेले त्यांनी कोणाच्या नावाने झेंड्याने मागील निवडणुकीत मते मागितली. सगळं घेऊन ही मंडळी गेली,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर काटेरी बाण सोडले.
बारामती येथे शेतकरी, कष्टकरी कामगार मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले. पवार म्हणाले, यंदा काही लोकांनी वेगळी भुमिका घेतली. लोकशाहीमध्ये कोणालाही भुमिका घेण्याचा अधिकार आहे. पण एक अट आहे. मी तुम्हाला मत मागितले, तुम्ही मला निवडून दिले. निवडून दिल्यानंतर मत ज्या नावाने, पक्षाने, कार्यक्रमाने मागितले. तुम्ही ते नाव पक्ष सर्व काही विसरला. तुम्ही लोकांची फसवणूक करता. ही फसवणूक होता कामा नये. राजकारणात शब्दाला किंमत असते. तुम्ही लोकांची फसवणूक करता, राजकारणात शब्दाला किंमत आहे.
मोदीसाहेब बारामतीला आले होते. त्यांनी येथे भाषण केले. तुमचे बोट धरुन राजकारणात आल्याचे त्यांनी सांगितले. पार्लमेंटमध्ये ते भेटतात, प्रेमाने बोलतात. ते बोलतात ठीक, पण त्यांचे धोरण काय आहे. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. मात्र, आज सत्ता हुकुमशाहीच्या दिशेने जात आहे. झारखंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर झालेली कारवाई हे आपल्यासमोर उदाहरण आहे, असंही पवार म्हणाले.
पंतप्रधानांवर टीका
पुढे बोलताना पवार म्हणाले, कारखानदार, उद्योगपतींचे कर्ज माफ होते. त्यावेळी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या देशाची भुक भागविणाऱ्या शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज आम्ही त्यावेळी माफ केले. आजचे प्रधानमंत्री कर वसुल करतात. वसुलीचे १०० रुपये आले तर ६ रुपये खिशात टाकतात आणि सांगतात तुमच्या खिशात पैसे टाकले. त्यांची पैसे टाकायची गॅरंटी आहे, १०० रुपये घेऊन ६ रुपये देतात. पैसे देण्याची गॅरंटी असल्याचे सांगतात पण ती १०० रुपये वसुल करण्याची गॅरंटी आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने हे योग्य नाही. देशाच्या हिताचा हा प्रकार नसल्याची टीका पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.