ओझर : जुन्नर तालुक्यातील कांदळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाचा आपला उमेदवार पराभूत झाल्याचे कार्यकर्त्यांना सहन न झाल्याने, त्यांनी गावात जोरदार धिंगाणा घातला. ज्या वस्तीने आपल्याला मतदान केले नाही, या संशयाने त्यांनी आंबेओहळवस्तीवर जाणारा सिमेंटकाँक्रीटचा रस्ताच जेसीबीच्या साहाय्याने उखडला.वेळीच तिथले ग्रामस्थ जमा झाल्यामुळे उर्वरित रस्ता बचावला. एवढे करूनही कार्यकर्ते थांबले नाहीत, तर काही ग्रामस्थांना घरकुल योजनेतून मिळालेली घरे पाडण्याची तंबी दिली.या कार्यकर्त्यांच्या दहशतीची तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात होते. एक सर्वसामान्य कार्यकर्ता तर दुसºया उमेदवाराने गावचे सरपंचपद भूषाविले होते. वडील अनेक वर्षे गावचे सरपंच व राजकारणात या कुटुंबाचा नावलौकिक आहे. तिसºया उमेदवाराचे वडील पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषाविले आहे. राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांची त्यांची लगट आहे. त्यांच्या मुलाचा पराभव झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिमेंट रस्ता उखडण्याचा हा भीमपराक्रम केला. हा रस्ता ग्रामपंचायतीने १३ व्या वित्त आयोगातून खर्च करून केला असल्याचे प्रभारी सरपंच यांनी सांगितले.याबाबत गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ही गंभीर बाब असून सरपंच व ग्रामसेवक यांना सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याबाबत पत्र देणार आहे.>सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून झाल्यामुळे सर्वसामान्य कार्यकार्त्यांना न्याय मिळत असल्याच्या प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहे.सरपंचपदी निवडून आलेले विक्रम भोर म्हणाले की, निवडणूक ही एक दिवसाची असून जय- पराजयाचा राग डोक्यात न ठेवता गावच्या विकासासाठी सर्वांनी बरोबर काम करावे. काय कारवाई होते, याकडे तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
उमेदवार हरल्याने कार्यकर्त्यांनी रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:42 AM