लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित कलावंत संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कवी मेळावा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनी दिली.
सोमवारी (दि. २१) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, सचिव वि. दा. पिंगळे, संचालक देवेंद्र सूर्यवंशी, दिवाकर पोफळे यावेळी उपस्थित होते.
बराटे म्हणाले की, राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष चेतन तुपे यांच्या हस्ते २५ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्यिक भारत ससाणे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून महापौर मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उदघाटनानंतर प्रा. आप्पासाहेब खोत, डॉ. प्रतिभा जाधव यांचे कथाकथन, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी डॉ. वर्षा तोडमल यांच्या गप्पा असे कार्यक्रम होतील. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवल्याने हा राष्ट्रीय प्रश्न संपला का,’ या विषयावर उल्हास पवार आणि माधव भंडारी यांचा परिसंवाद तसेच भारूड आदी कार्यक्रम होणार आहेत. अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कविता सादरीकरणाने संमेलनाचा समारोप होईल.