गराडे : सासवड-हडपसर रस्त्यावर दिवे गावाजवळील पवारवाडी (ता. पुरंदर) येथील वळणावर सकाळी ७ वा.च्या सुमारास रासायनिक खतांचा ट्रक पलटी झाला. सुदैवाने त्या वेळी आजूबाजूला कोणतेही वाहन व माणसे नसल्याने मोठा अपघात टळला. ट्रकमधील ट्रकचालक व मदतनीस यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पवारवाडीतील युवकांनी या वेळी ट्रकचालक व मदतनीस यांना धीर देऊन मदत केली. हा ट्रक चिपळूण येथून श्रीराम सुपर कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट पावडर या रासायनिक खतांच्या पिशव्या घेऊन दिवे घाटमार्गे फुरसुंगी गावाकडे निघाला होता.याबाबत सासवड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार योगेश पवार यांनी सांगितले की याबाबत सासवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली नाही. दिवे गावाजवळील पवारवाडी येथील हे वळण अतिशय धोकादायक असून जीवघेणे आहे. आतापर्यंत या वळणांवर खूप अपघात झाले असून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सासवड-हडपसर रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही बरेच दिवस रेंगाळलेले आहे. तसेच हे काम चालू असताना हे वळण सरळ करण्यासाठी कोणीही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. हे वळण सरळ झाल्यास अनेक अपघात टळतील, असे सासवड शहर भाजपा पार्टीचे अध्यक्ष साकेत जगताप यांनीसांगितले. (वार्ताहर)
पवारवाडी वळणावर ट्रक उलटला
By admin | Published: January 23, 2017 2:16 AM