पुणे : पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनात जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्काराने गौरवले जाणार आहे. यावेळी लोकसहभागातून नदी शुध्दीकरणाचा संकल्प हाती घेतला जाणार आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे फ्रूटवाले धर्मशाळेच्या परिसरात होणार असून, ज्येष्ठ समीक्षक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षपद भूषवणार आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पसायदान विचार साहित्य संमेलनात विश्वात्मकता, मानवतावाद, सामाजिक आयाम आदींवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त आणि साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रकाश पायगुडे, सुनिताराजे पवार आदी उपस्थित होते.राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी संस्थानच्या वतीने देहू ते आळंदी लोकसहभागातून जलशुध्दीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. पर्यावरणाचा-हास रोखण्यासाठी नदी शुध्दतेला प्राधान्य दिले जाणार आहे. नदीची स्वच्छता, जलपर्णींची वाढ रोखण्यासाठी प्रयत्न, निर्माल्याची व्यवस्था आदींवर भर दिला जाणार आहे. यासाठी नागरिकांसह वारकरी, स्थानिक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, एनसीएस पथक आदींना या प्रकल्पांमध्ये सामावून घेतले जाणार आहे.शुक्रवारी, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संमेलानध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्यासह खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे, नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उदघाटन होणार आहे. रात्री ९ ते ११ या वेळेत निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडणार आहे. मनोहर जाधव कवीसंमेलमनाच्या अध्यक्षस्थानी असतील.शनिवारी, १४ एप्रिल रोजी डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत, ‘पसायदानाची वैश्विकता’, ‘माझा धर्म आणि पसायदान’ या विषयांवर चर्चासत्र, सर्वधर्म प्रार्थना, एकांकिका, हरिपाठ, औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांचे कीर्तन आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.रविवारी, १५ एप्रिल रोजी ‘मला उमगलेले पसायदान’, ‘माझे राजकारण, माझे अध्यात्म’, ‘संतवाणी’ या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ४.३० वाजता कौतिकराव ठोलेपाटील यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार असून यावेळी डॉ. राजेंद्रसिंह यांना पसायदान पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
पसायदान विचार साहित्य संमेलनात नदी शुध्दीकरणाचा संकल्प, राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 6:18 PM
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पसायदान विचार साहित्य संमेलनात विश्वात्मकता, मानवतावाद, सामाजिक आयाम आदींवर भर दिला जाणार आहे
ठळक मुद्देहे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे फ्रूटवाले धर्मशाळेच्या परिसरात होणार ज्येष्ठ समीक्षक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षपद भूषवणार राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जलशुध्दीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार