पुणे : ‘तो’ जाऊन आज वीस दिवस झाले. त्याची आठवण नाही असा एकही दिवस जात नाही. त्याचे वडील अजूनही त्या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. घरात आता कमवणारी ’मी’ एकटीच. ‘तो’ हाताशी होता तर एक आधार होता. पण आता पुन्हा जगण्याची लढाई सुरू झाली आहे. लहान मुलाच्या मदतीने चहाची टपरी पुन्हा चालू केली आहे. लोक येतात, आपुलकीने विचारपूस करतात. तेव्हा ‘त्याचा’ चेहरा डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही. डोळे ओलावतात. ते पुसूनच लोकांना चहा देते... ही कथा आहे जगप्रसिद्ध ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला लागलेल्या आगीत बळी गेलेल्या प्रतीक पाष्टेच्या आईची.
अवघ्या २२ वर्षांचा प्रतीक ‘सिरम’ला लागलेल्या आगीत जळून खाक झाला. त्याची आई नूतन प्रभात रस्त्यावरील कॅनॉल मार्गावर चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करते. प्रतीक त्यांचा मोठा मुलगा होता, नुकताच हाताशी आलेला. पण तो कामाला गेला आणि परतलाच नाही. आगीची दुर्घटना घडल्यानंतर ‘सिरम’ने तातडीने या आगीतील बळींच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र आजतागायत या संदर्भात ‘सिरम’कडून कोणीही संपर्क साधला नसल्याचेही नूतन पाष्टे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
प्रतीक ‘डिप्लोमा’च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. आईला सकाळी दुकान लावून दिल्यानंतर तो कॉलेजला आणि मग कामावर जायचा. घरची परिस्थिती बदलण्यासाठी तो खूप कष्ट घ्यायचा. त्या दिवशी तो काही सहकाऱ्यांसमवेत ‘सिरम’मध्ये ‘इनव्हर्टर’ बसवण्याच्या कामाला गेला. पण गेला तो परत आलाच नाही. ‘सिरम’च्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत प्रतीकचा होरपळून मृत्यू झाला.
या घटनेनंतर ‘सिरम’ने मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रूपयांची मदत जाहीर केली होती. या घटनेस वीस दिवस झाले तरी अद्याप पाष्टे कुटुंबीयांना मदतीची रक्कम मिळालेली नाही. ‘सिरम’मधील कुण्या अधिकाऱ्याने अजून त्यांची भेट घेतलेली नाही. स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे घरी येऊन गेल्याचे नूतन पाष्टे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, प्रतीक ज्या खासगी इन्व्हर्टर कंपनीत काम करत होता, त्या कंपनीने प्रतीकच्या कुटुंबीयांकडे काही कागदपत्रे मागितली असल्याचे प्रतीकचे मामा समीर घाणेकर यांनी सांगितले. मात्र यातही पुढे कोणतीही हालचाल झालेली नाही.