पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात २५० मीटर लांबीचा ब्रेक चाचणी ट्रॅक उभारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने २ वर्षांची मुदत दिल्याने वाहनांचे बंद असलेले पासिंग अखेर शुक्रवारी सुरू झाले आहे. या दिवसांत ज्या गाड्यांचे पासिंग रखडले आहे, ते सुटीच्या दिवशी करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. पुढील महिनाभरात हा पासिंगचा बॅकलॉग भरून काढण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यभरातील सर्व कार्यालयांतील वाहनांचे पासिंग (योग्यता प्रमाणपत्र तपासणी) मागील आठवड्यात (२४ आॅगस्ट)पासून बंद करण्यात आलेले होते. वाहनांची योग्य प्रकारे चाचणी न करता फिटनेस तसेच ब्रेक टेस्ट सर्टिफिकेट आरटीओकडून दिले जाते. त्यामुळे अपघातांत वाढ झाली आहे. यामुळे परिवहन विभागाला वाहनांची योग्य प्रकारे चाचणी घेऊनच फिटनेस व ब्रेक टेस्ट सर्टिफिकेट देण्याचा आदेश द्यावा, यासाठी पुण्याचे श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी सध्या सुरू आहे. या सुनावणीदरम्यान, सहा महिन्यांत टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने एका महिन्याच्या आत हमीपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाकडून हे ब्रेक चाचणी ट्रॅक उभारण्यासाठी १५ महिन्यांची मुदत मागण्यात आली होती; मात्र ती दोन वर्षांनी वाढवून देण्यात आली आहे. यामुळे आरटीओ प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)तातडीने ट्रॅक पूर्ण करणार कायद्यातील तरतुदीनुसारच हा ट्रॅक उभारणे बंधनकारक आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जागा उपलब्ध नसल्याने हा ट्रॅक बांधण्यात आला नसल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, बंद असलेल्या पासिंगची बाब गंभीर असल्याने अशी स्थिती भविष्यात उद्भवू नये, यासाठी येत्या काही महिन्यांत तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जागा मिळवून ट्रॅक उभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी पिंपरी आणि पुण्यात प्रत्येकी एक ट्रॅक उभारण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पासिंगचा ‘बॅकलॉग’ भरून काढणार
By admin | Published: September 03, 2016 3:18 AM