पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ - २० परीक्षेमध्ये जी. ए. सॉफ्टवेअरचा प्रीतीश देशमुख याने इतरांशी संगनमत करुन तब्बल ७ हजार ८८० अपात्र परीक्षार्थींचे पैसे घेऊन त्यांना पात्र केले होते. त्यातील एका एजंटाकडील तब्बल १ हजार १२६ अपात्र परीक्षार्थींना पात्र केलेल्या सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याबरोबर या ७ हजार ८८० अपात्रांपैकी सर्वाधिक २ हजार ७७० अपात्र परीक्षार्थी नाशिक विभागातील असल्याचे आढळून आले आहे.सायबर पोलिसांनी मुकुंद जगन्नाथ सूर्यवंशी (वय ३३, रा. मालेगाव, जि. नाशिक) याला अटक केली आहे. सूर्यवंशी याला पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
सूर्यवंशी हा शिक्षक असून यातील एक आरोपी राजेंद्र सोळुंके व मुकुंद सूर्यवंशी हे दोघेही एकाच गावचे राहणारे आहे. संतोष हरकळ याच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये १२७० परीक्षार्थीची नावे, सीटनंबर, जात अशी नोंद असलेली एक्सेल शीट प्राप्त झाली आहे. या १२७० परीक्षार्थीची यादी ही शिक्षण विभागाकडील टीईटी २०१९ - २० परीक्षेच्या अंतिम निकाल व प्रीतीश देशमुख याच्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे कार्यालयाकडून जप्त करण्यात आलेली हार्डडिस्क ची तांत्रिक विश्लेषणाद्वारे पडताळणी केली. त्यात संतोष हरकळ याच्या लॅपटॉपमधील १२७० परीक्षार्थीची यादी पैकी ११२६ परीक्षार्थीचे गुण वाढविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी गुण वाढविल्याची यादीमधील कोण कोणत्या परीक्षार्थींना मुकुंद सूर्यवंशी याने संपर्क केला होता. याचा तपास करण्यात येत आहे. तसेच त्याच्याशिवाय आणखी कोणी एजंट आहेत, याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सांगितले.
नाशिक विभागात सर्वाधिक अपात्र परीक्षार्थींना केले पास
टीईटी परीक्षा २०१९ -२० मधील अंतिम निकालात १६ हजार ७०५ परीक्षार्थींना पात्र केले होते. त्यापैकी ७ हजार ८०० अपात्र परीक्षार्थींकडून एजंटामार्फत पैसे घेऊन पास करण्यात आले आहे. त्यापैकी नाशिक विभागामधील अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्याची संख्या २ हजार ७७० इतकी असून ती इतर कोणत्याही विभागाच्या तुलनेत जास्त असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.