पुणे : मुंबईला सोडण्याच्या बतावणीने मोटारचालक आणि त्याच्या साथीदारांनी प्रवाशाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबई-बंगळुरू बाहयवळण मार्गावर ही घटना घडली होती. चोरट्यांनी प्रवाशाकडील क्रेडीट कार्डचा गैरवापर करून खात्यातील ३ लाख ६८ हजारांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सुधीर जालनापुरे (वय ५९, रा. कोल्हापूर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालनापुरे कामानिमित्त पुण्यात आले होते. गेल्या महिन्यात २४ जून रोजी ते मुंबईला निघाले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाहयवळण मार्गावरील चांदणी चौकात ते मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी मोटारचालक आणि साथीदार तेथे आले. त्यांनी जालनापुरे यांच्याकडे मुंबईला निघालो असल्याची बतावणी केली. दादर येथे सोडतो, असे मोटारचालकाने त्यांना सांगितले. त्यानंतर तळेगाव टोलनाक्यापासून काही अंतरावर मोटारचालक आणि साथीदारांनी धावत्या मोटारीत जालनापुरे यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली. त्यांच्याकडील क्रेडीट कार्ड आणि अंगठी चोरट्यांनी काढून घेतली. चोरट्यांनी जालनापुरे यांना दुपारी बाराच्या सुमारास मानखुर्द रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर सोडले. चोरट्यांनी जालनापुरे यांना धमकावून क्रेडीट कार्डचा सांकेतिक शब्द घेतला होता. त्याचा गैरवापर करून चोरट्यांनी जालनापुरे यांच्या खात्यातील ३ लाख ६८ हजार रुपये काढून घेतले. चोरट्यांनी एकूण मिळून ३ लाख ८० हजार ९६० रुपयांचा ऐवज चोरल्याचे उघडकीस आले आहे.
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 8:24 PM
चोरट्यांनी प्रवाशाकडील क्रेडीट कार्डचा गैरवापर करून ३ लाख ६८ हजारांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे.
ठळक मुद्देपुणे -मुंबई प्रवासातील घटना : क्रेडिट कार्डवरुन काढले पैसे