लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या असाधारण परिस्थितीत प्रवासी घटले, उत्पन्न कमी झाले पण एसटीच्या पुणे विभागाची धाव अजूनही सुरू आहे. एकही आगार किंवा फेरी डिझेल अभावी अद्याप बंद पडलेली नाही.
पुणे विभागातील गाड्या कोरोनापूर्वी रोज सव्वादोन लाख किलोमीटर धावायच्या. प्रत्येकी २० हजार लिटरचे ६ डिझेल टँकर त्यावेळी लागायचे. आता प्रवासी संख्या कमी झाली आहे. ६० हजार लिटरच डिझेल रोज लागते. ते व्यवस्थित मिळते अशी माहिती विभागीय भांडार अधिकारी भाऊसाहेब धनावडे यांनी दिली.
एसटीचे शंकरशेठ रोड विभागीय कार्यालय, तसेच स्वारगेट इथे एसटीच्या साठवण टाक्या आहेत. त्याशिवाय दौंड व अन्य काही आगारांमध्ये व्यवस्था आहे. सध्याची डिझेलची मागणी कमी आहे. प्रत्येक ठिकाणी पूर्वी एक डिझेलचा एक टँकर शिल्लक ठेवला जायचा. मात्र, आता तसे न करता एसटीच्या फेऱ्र्यांचा अंदाज घेऊन आवश्यकतेप्रमाणे डिझेल ठेवले जाते. खरेदीही गरजेप्रमाणे केली जाते. इंडियन ऑइल कंपनी १२ आगारांमध्ये व भारत पेट्रोलियम एका आगारात डिझेलचा पुरवठा केला जातो. आतापर्यंत कोणत्याही आगारात एकही गाडी डिझेल अभावी बंद पडलेली नाही, असे धनावडे यांनी सांगितले.
एसटी पुणे विभागाचे उत्पन्न प्रवासी कमी झाल्यामुळे घटले आहे. डिझेलची खरेदी रोखीने करावी लागते. तरी नियमित ग्राहक म्हणून दोन्ही कंपन्यांनी क्रेडिट दिले आहे. त्यामुळेच सध्या आवश्यकतेनुसार खरेदी असे धोरण राबवण्यात येत आहे अशी माहिती विभागीय भांडारातून देण्यात आली.