प्रवासी पाच लाखांवर
पुणे : लॉकडाऊननंतर मार्गावर धावू लागलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. मागील चार महिन्यांत प्रवासी संख्या पाच लाखांवर पोहचली असून, उत्पन्नानेही पाऊण कोटींचा टप्पा गाठला आहे.
लॉकडाऊनमध्ये पीएमपीची बससेवा पुर्णपणे ठप्प होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही बस मार्गावर धावत होते. दि. ३ सप्टेंबर रोजी नियमित बससेवा सुरू झाली. सुरूवातीला मोजक्याच मार्गांवर बस धावत होत्या. त्यानंतर टप्प्याटप्याने बससंख्या व मार्ग वाढविण्यात आले. त्यानुसार प्रवासी व उत्पन्नातही वाढ होत गेली. लॉकडाऊनपुर्वी पीएमपीला दररोज सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. तर प्रवासी संख्या जवळपास दहा लाख एवढी होती. अनलॉकमध्ये ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या मनामध्ये कोरोनाची प्रचंड भिती होती. त्यामुळे अनेक प्रवासी बसने प्रवास करणे टाळत होते. पण शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर बसचा प्रतिसादही वाढू लागला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रशासनाने सुरू केलेली अटल बससेवा, औद्योगिक, धार्मिक ठिकाणांसाठी जोडणारी सेवा सुरू केली. या सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मागील महिन्यात १७ तारखेला पीएमपीचे उत्पन्न ५० लाखांवर तर प्रवासी संख्या ३ लाखांवर पोहचली. त्यानंतर महिनाभरातच प्रवाशांचा आकडा पाच लाखांवर पोहचल्याने उत्पन्नही पाऊण कोटींवर गेले. लॉकडाऊनपुर्वीच्या तुलनेत प्रवासी व उत्पन्न ५० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. सध्या शाळा व महाविद्यालये बंद असल्याने पीएमपीला पासाद्वारे मिळणारे उत्पन्न कमी मिळत आहे.
-------------
पीएमपी प्रवासी व उत्पन्न (दि. २८ डिसेंबर)
प्रवासी संख्या - ५,०९,१४०
तिकीट उत्पन्न - ७१,४९,०३९
पास उत्पन्न - ३,८१,११२
एकुण उत्पन्न - ७५,४९,०३९
मार्गावरील बस - १३१४
ब्रेकडाऊन बस - ११
---------------------
लॉकडाऊननंतर पीएमपीची बससेवा ३ सप्टेंबरपासून सुरू झाली. कोविडपुर्वीच्या प्रवासी संख्येच्या तुलनेत ५० टक्के प्रवासी सध्या पीएमपीने प्रवास करू लागल्याचा आनंद आहे. नवीन बस मार्ग व बससेवांमुळे हे शक्य होत आहे. बससेवेवर दाखविलेल्या विश्वास व सहकार्याबद्दल पुणेकरांचा आभारी आहे.
- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
---------------------