लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाईल विकण्यासाठी ग्राहक शोधत असलेल्या दोघांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकांनी पकडले. त्याच्याकडून ३ मोबाईल जप्त केले होते. आरोपी सापडला, मोबाईलही जप्त करण्यात आला़ पण चोरीची तक्रारच दाखल केली नव्हती. तेव्हा पोलिसांनी फिर्यादीचा शोध घेऊन तक्रार दाखल करुन घेतली.
दीपक ऊर्फ दिपु रमेश कांबळे (वय २०, रा. पारशी जिमखाना, निर्मल विहार कॉलनी) असे मोबाईल चोरट्याचे नाव आहे.
पोलीस अंमलदार समीर पटेल यांना माहिती मिळाली की, पुणे स्टेशन येथील वाहनतळाजवळ दोघे जण मोबाईल विकण्यासाठी ग्राहक शोधत आहेत. त्यानुसार सहायक निरीक्षक प्रकाश मोरे, किशोर वग्गा, चेतन गोरे, निखिल जाधव, समीर पटेल यांनी तेथील बसस्टॉपवर थांबलेल्या दीपक कांबळे याला पकडले. त्याचा साथीदार पळून गेला. त्यांच्याकडे तीन मोबाईल मिळाले. त्यावरुन शोध घेतला असता अजित महावीर कांबळे (वय २९, रा. भेकराईनगर, हडपसर) हे ६ फेब्रुवारी रोजी पहाटे गावावरुन पुणे स्टेशनला परतले होते. पायी जात असताना दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता. युनिट २ च्या कार्यालयातून मोबाईल मिळाल्याचा फोन आल्यावर त्यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली.