पुणे: दिवाळीच्या काळात पुणे स्थानकावर (pune railway station) नातेवाइकांना सोडायला येणे आता महागात पडणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने दिवाळीत होणारी गर्दी लक्षात घेता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपयांहून वाढवून ३० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
२५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या काळात प्लॅटफॉर्म तिकीट ३० रुपये असणार आहे. दिवाळीत फलाटावर कमीत कमी गर्दी व्हावी याकरिता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. १० नोव्हेंबरनंतर पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये केले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या पुणे स्थानकावर रोज दीड हजारहून अधिक प्रवासी प्लॅटफॉर्म तिकीट काढत आहेत.
सध्या पुण्यातून निघणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांना रिग्रेट लागला आहे. तसेच वेटिंग सीटही उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे या काळात स्टेशनवर गर्दी होण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जरी कोरोना रुग्ण कमी होत असले तरी नागरिकांना काळजी घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.