मार्गासनी (पुणे): स्वारगेट ते गुहिनी व स्वारगेट ते कुंबळे एसटी सेवा सुरू राहावी यासाठी प्रवाशांनीच खचलेला रस्ता भर टाकून श्रमदान करून दुरुस्त केला आहे. या खचलेल्या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले आहे.
वेल्हे ते केळद रस्त्यावर भट्टी गावच्या पुलाच्या वरच्या बाजूस रस्ता खचला आहे. या परिसरातील 18 गाव मावळ परिभागातील जनतेचा संपर्क तुटणारी परिस्थिती निर्माण झालेली होती. या संदर्भात दैनिक लोकमतने सर्वप्रथम आवाज उठवला होता. त्याबद्दल ग्रामस्थांनी व प्रवाशांनी लोकमतचे आभार मानले.
वेल्हे ते केळद रस्त्यावर खचलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी सूचना केलेल्या होत्या. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. भोर आगारातील सुटणारी स्वारगेट ते गुहिणी ही एसटी रात्री मुक्कामी होती. सकाळी स्वारगेटकडे येत असताना एसटीमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी आल्यावर एसटीमधील प्रवाशी खाली उतरले. खचलेल्या ठिकाणी भराव करण्यासाठी मोठ मोठे दगड आणून भराव घालून रस्ता दुरूस्त केला. त्यामुळे केळद ते वेल्हे रस्ता पुन्हा सुरु झाला.
भराव घालून रस्ता दुरूस्त करण्यासाठी गुहिणी स्वारगेट बसचे चालक दिलीप साळुंखे वाहक योगेश मोहिते प्रवाशी किसन रेणुसे, किशोर भुरुक, सुरेश गोहिणे, अंकुश गोहिणे, नारायण सावले, ज्ञानोबा मोरेकर, धोंडीबा डोईफोडे, राजू खोपडे, बापु गोहिणे इतर महिला प्रवाशी होत्या.