पुणे : बंगळुरूला जाणारे एअर एशियाचे विमान सकाळी साडेपाच वाजता असल्यामुळे प्रवासी पहाटे तीन वाजल्यापासून पुणेविमानतळावर आले होते. पण दुपारी तीन वाजेपर्यंत विमानच न आल्यामुळे प्रवाशांना सुमारे दहा तास विमानतळावर ताटकळत रहावे लागले. त्यानंतर दुपारी तीन वाजताचे जयपूरला जाणारे विमान बंगळुरूच्या प्रवाशांना देण्यात आले. त्यामुळे जयपूरला जाणाऱ्या प्रवाशांनाही काही तास मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घालत विमान कंपनीचा निषेध केला.
सकाळी साडेपाच वाजता विमान असल्यामुळे प्रवासी पहाटे विमानतळावर पोहोचले. विमान वेळेवर न आल्यामुळे त्यांनी काही काळ वाट पाहिली. मात्र, एक-दोन तासानंतर प्रवाशांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. ठोस उत्तर न मिळाल्यामुळे प्रवाशांनी जाब विचारला. कोणाला दवाखान्यात, कोणाला मीटिंगला तर काही जणांना मुलाखतीसाठी जायचे होते. या सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सुमारे दहा तास हे प्रवासी विमानतळावर अडकले होते. अखेर विमान कंपनीने जयपूरला जाणारे दुपारी २.५५ वाजताचे विमान बंगळुरूला पाठवण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी यावेळी एअर एशियाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. जयपूरचे विमान बंगळुरूला पाठविल्यामुळे जयपूरचे प्रवासी रखडले. जयपूरच्या प्रवाशांनी भुवनेश्वरला जाणारे विमान जयपूरला सोडण्याची मागणी केली. मात्र जयपूरला साडेपाच शिवाय विमानच नसल्याचे विमान कंपनीने ऐनवेळी सांगितले. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर घोषणाबाजी केली.
माझे वडील मरणाच्या दारात...
जयपूरला जाणाऱ्या विमानाला उशीर झाल्यानंतर एक तरुणी धाय मोकलून रडताना दिसली. ती म्हणाली, माझे वडील दवाखान्यात ॲडमिट असून मरणाशी झुंज देत आहेत. विमानच नसल्यामुळे मी आता कशी जाणार?
विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानात बिघाड झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आम्ही लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करत आहोत.