------------------
जवळचे भाडे नाकारणे : लांबच्या प्रवासाला जास्तीचे पैसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रात्री उशिरा रेल्वे किंवा बसस्थानकांवर उतरलेल्या प्रवाशांना रिक्षाचालकांकडून त्रास दिला जात आहे. पोलिसी कारवाईनंतर याला काही दिवस आळा बसतो व त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे होत असल्याचे नियमित प्रवास करणारे सांगतात.
एकमेकांचे प्रवासी पळवण्याचे प्रकारही आता होत आहेत. असे रिक्षाचालक स्थानकांवरील रिक्षा थांब्यांपासून थोड दूर थांबतात. नियमित प्रवास करणाऱ्यांना ते माहिती असते. त्यामुळे ते स्थानकांपासून थोडे दूर अंतर चालत जाऊन नंतर रिक्षा करतात. यावरून थांब्यांवरील रिक्षाचालक व दूर अंतरावर थांबलेले रिक्षाचालक यांच्यात भांडणे होऊन त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
‘शेअर रिक्षा’ असा एक उपक्रम सुरू झाला होता. यात पोलिसांच्या साक्षीने प्रवाशाला रिक्षा करून दिली जात होती, त्याची नोंद होत असे. मात्र, ते आता बंद झाले आहे. ते सुरू करावे अशी प्रवाशांची मागणी आहे.
स्वारगेट, वाकडेवाडी व पुणे बसस्थानक या तिन्ही ठिकाणी मोठे बसथांबे आहेत. तिथे दिवसा फारसा त्रास होत नाही. मात्र, रात्री उशिरा आलेल्या प्रवाशांना नेहमीच रिक्षाचालकांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. स्थानकापासून त्यांचे घर जवळच्या अंतरावर असेल, तर रिक्षाचालक येतच नाही. एकजण नाही म्हणाला म्हणून दुसऱ्याला विचारले तर तोही नाही म्हणूनच सांगतो.
लांब जाणारा प्रवासी असेल तर मीटरप्रमाणे भाडेआकारणी न करता ठरवून पैसे मागितले जातात. ते मीटरपेक्षा कितीतरी जास्त असतात. थांब्यांवरच्या दुसऱ्या रिक्षाचालकांकडूनही अशीच मागणी होते.
पुणे, शिवाजीनगर या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या बाहेरही असाच प्रकार होत असतो. तिथेही मोठे रिक्षाथांबे आहेत. रोज फक्त रात्रीच व्यवसाय करत असल्याने तेथील रिक्षाचालकांची एकजूट असते. त्यामुळे एकाने काही भाडे सांगितले, तर दुसराही तेवढीच मागणी करतो. नाईलाजाने प्रवाशांना ते मान्य करावे लागते.
प्रवासी काय म्हणतात :
-मी दररोज रेल्वेने जा-ये करत असतो. दोन्ही रेल्वे स्थानकावरचा माझा अनुभव असाच आहे. अखेर मी आता माझी दुचाकी घेऊन यायला लागलो आहे. ती स्थानकाच्या आसपास लावून ठेवतो, मात्र त्यात वाहनचोरीला जाण्याची धाकधूक दिवसभर मनात असते.
- युवराज कानडे, पुणे
- रिक्षाचालकांबरोबर वाद घालण्याची आता भीतीच वाटते. रात्रीचा व्यवसाय करणारे रिक्षाचालक वेगळेच असतात. त्यामुळे काळजी घ्यावीच लागते. दुसरी काहीच व्यवस्था नसल्याने नाईलाज म्हणून रिक्षा वापरावीच लागते. तक्रार करावी तर तिथे रात्री कोणीही पोलीस वगैरे नसतात.
- विशाल मोरे, पुणे
कायदा काय आहे?
- रात्री १२ ते पहाटे ५ यावेळातच प्रवाशांकडून सव्वापट भाडे आकारावे. तशी तरतूद मीटरमध्येच केलेली असावी. लगेज आकारणी करू नये. प्रवाशांकडून भाडे मीटरप्रमाणेच घ्यावे.
प्रत्यक्षात काय होते
- हा कायदा पाळला जात नाही. मीटर असले तरी ते न वापरता लांबचे भाडे आधीच ठरवून घेण्याचा प्रयत्न होतो.