पुणे : रिफ्लेक्टरवरून पुणे आरटीओ कार्यालयात रोज नवे वाद होत असून, आता रिक्षाचालकांना दिलासा देणारी बातमी आहे. ज्या रिक्षांना या पूर्वी लावलेले रेडियम टेप (रिफ्लेकटर) जर योग्य स्थितीत असतील, तर त्यांना पासिंगसाठी नवे रिफ्लेकटर लावण्याची गरज नाही. यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी आदेश दिला असून गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला.
रिफ्लेकटरसाठी पूर्वी रिक्षाचालकांना केवळ शंभर ते दीडशे रुपये खर्च येत असताना आता त्यांना ८०० ते १००० रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांत असंतोष निर्माण झाला होता. याबाबत रिक्षा संघटनानी आंदोलन देखील केले होते. गुरुवारी सासवडच्या टेस्ट ट्रॅकवर अशा व जवळपास ४६ रिक्षाचे पासिंग करण्यात आले.मात्र ज्या रिक्षा नवीन आहेत तसेच जुन्या रिक्षावर वरील पूर्वीचे रिफ्लेकटर योग्य स्थित नसतील अशा रिक्षांना नवे रिफ्लेकटर लावावे लागतील.त्या शिवाय रिक्षाचे पासिंग होणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.
रिक्षांना २० एमएमचे टेप योग्य असताना विनाकारण ५० एमएमचे घेण्याची सक्ती आहे. यामुळे रिक्षाचालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे. त्याबाबत आमचा लढा सुरूच आहे. मात्र जुने व योग्य स्थितीत असलेल्या रिफ्लेकटरवर पासिंग करण्यास मंजुरी मिळाल्याने हजारो रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आम आदमी रिक्षा संघटना सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी दिली.