- श्रीकिशन काळे
पुणे : नागरिकांना लवकर पासपोर्ट मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी सेवा केंद्रेदेखील वाढविण्यात आली. योग्य कागदपत्रे असतील, तर त्यांना लगेच घरपोच पासपोर्ट मिळतो. गेल्या वर्षी जवळपास साडेतीन लाख जणांना पासपोर्ट दिला. नागरिकांसाठी डिसेंबर महिन्याच्या चारही शनिवारी सेवा केंद्रे सुरू ठेवली होती. तत्काळ अपॉइंटमेंटची संख्या पासपोर्ट सेवा केंद्रांत दररोज २०० केली आहे, अशी माहिती पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जुन देवरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोविड काळातील २०२० व २०२१ मध्ये सोशल डिस्टन्सिंगमुळे पासपोर्ट अपॉइंटमेंन्ट कमी कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर आता पासपोर्टची मागणी वाढली आहे. पुणेअंतर्गत १२ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र येते. त्यामुळे आम्ही बाणेर मुख्य कार्यालय, मुंढव्यात व सोलापूरला पासपोर्ट सेवा केंद्र कार्यरत आहेत. इतर जिल्ह्यांसाठी टपाल कार्यालयातही १७ ठिकाणी सेवा केंद्रे सुरू आहेत. काेणत्याही नागरिकाने पासपोर्ट काढण्यासाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्व माहिती अगोदर समजून घ्यावी. त्यानंतर ऑनलाइन अर्ज करावा. सर्व योग्य कागदपत्रे अपलोड केल्यावर त्यांना अपॉइंटमेंट मिळू शकते.
ही कागदपत्रे आवश्यक
तत्काळसाठी १३ महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी तीन कागदपत्रे व ॲड्रेस प्रूफ आणि शिक्षणाचा दाखला आवश्यक आहे. त्यामध्ये आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार कार्ड आणि वाहन परवान्याचा समावेश आहे, असेही डॉ. देवरे म्हणाले.
बाहेरून छापलेले स्मार्ट कार्ड चालेना :
कागदपत्रे ओरिजनल असावीत. सरकारी ओरिजनल पूर्ण स्वरूपातील पीव्हीसी आधार कार्ड द्यावे लागते. जे सरकारने जारी केलेले असते. इतरत्र स्मार्ट कार्ड बनवून देणाऱ्यांचे कार्ड चालत नाही.
२०२१ मधील चित्र
- २ लाख ४५ हजार
पासपोर्टसाठी अर्ज प्राप्त
-२ लाख ३१ हजार ३४६
पासपोर्ट जारी
६ हजार ७३५
पोलिस पडताळणी प्रमाणपत्र (पीसीसी)
२०२२ :
- ३ लाख ७३ हजार
पासपोर्टसाठी अर्ज प्राप्त
- ३ लाख ४४ हजार
पासपोर्ट जारी
१२ हजारपेक्षा अधिक
- पोलिस पडताळणी प्रमाणपत्र (पीसीसी) :
येथे आहेत केंद्रे
पासपोर्ट काढायचा असेल, तर अर्ज करण्यासाठी https://www.passportindia.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन सर्व माहिती घ्यावी आणि ऑनलाइन अर्ज करावा. आता पुण्याचे क्षेत्रीय पासपोर्ट मुख्य कार्यालय बाणेर येथे आहे, तर मुंढवा आणि सोलापूर येथे लघु कार्यालये आहेत, तसेच नगर, बारामती, बीड, इचलकरंजी, जालना, कोल्हापूर, लातूर, माढा, नांदेड, उस्मानाबाद, पंढरपूर, परभणी, पिंपरी-चिंचवड, सांगली, सातारा, शिरूर आणि श्रीरामपूर येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत.
पासपोर्टसाठी सर्वसाधारण शुल्क : १५०० रु.
पहिल्यांदा व १८ वर्षांखालील सर्वांसाठी सवलतीत : १३५० रु. शुल्क
काही विशेष/किचकट खटल्यांमध्ये अधिक सतर्कता घ्यावी लागते. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांना पासपोर्ट देताना न्यायालयाकडून परवानगी आहे की नाही, ते पाहिले जाते. त्यांच्या खटल्याची माहिती आम्ही घेतो. न्यायालयाने परवानगी दिली, तरच त्यांना पासपोर्ट दिला जातो. ज्यांच्याकडे कागदपत्रे अपूर्ण आहेत, त्यांना ती पूर्ण करून देण्यासाठी एक वर्षाची मुदत देतो. एका वर्षात कागदपत्रे दिली नाहीत, तर त्यांच्याकडून अर्ज रद्द करण्यात येऊ शकतो.
- डॉ. अर्जुन देवरे, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, पुणे विभाग