वारजे : वारजे जुना जकात नाका भागातील जुनी असलेली श्रीशैल एज्युकेशनल ट्रस्टची शानू पटेल शाळेची इमारत पाडण्याचा घाट पुणे महापालिकेने चालवला आहे. २०१० पासून न्यायालयाचे आजवरचे वेळोवेळी आलेले सर्व निकाल विरोधात दिले आहेत. पालिकेच्या या संभाव्य कारवाईमुळे सुमारे ३००० विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे.शाळा १९९३ पासून या ठिकाणी अस्तित्वात आहे. या ठिकाणी एज्युकेशनल ट्रस्ट व एका सहकारी गृहरचना मंडळ यांच्यामध्ये शाळेच्या काही इमारतीच्या जागेवरून वाद सुरू आहे. सोसायटीने या प्रकरणात महापालिकेलाही वादी करून घेतले आहे. शाळेने २००४ मध्ये गुंठेवारी कायद्याप्रमाणे गुंठेवारीचे पैसे पालिकेला भरले होते. ती पुणे मनपाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात म्हणजे सुमारे चौदा वर्षाने रद्दबातल ठरवली आहे. याच आधारारवर शाळेवर कारवाई करण्याचा पालिकेचा मानस आहे. पण त्यासाठी शाळेला पुन्हा नोटीस द्यावे, असे पालिकेला वाटत नाही. २०१० मध्ये दिलेल्या नोटिसीच्याच आधारे पुन्हा शाळेची इमारत पाडण्याची कारवाई करण्याचा घाट पालिकेने घातला आहे.या शाळा इंग्रजी व मराठी अश्या दोन्ही माध्यमांचे सुमारे ३००० विद्यार्थी शिक्षण घेत असून परिसरातील इतर शाळेपेक्षा शैक्षणिक शुल्क कमी असल्याने यांची विद्यार्थीसंख्या जास्त आहे. त्यामुळे पालिकेच्या कारवाईत जर शाळा पाडली गेली तर सुमारे ३००० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंध:कारमय होऊ शकते.पालिकेला कारवाई करायचीच असेल कायदेशीर नोटीस देऊन किंवा याबाबत योग्य ती बैठक घेऊन, शाळेस पूर्वसूचना देऊन व न्यायालयाचा अवमान होणार नाही, असे नियोजन करून कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शाळेच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
पटेल शाळा पाडण्याचा घाट, तीन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 6:57 AM