लष्कर : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सरदार पटेल रुग्णालय हे कोव्हिड रुग्णालय असताना या सरकारी रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे आजपर्यंत यादीच पाठवली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यानिमित्ताने पटेल रुग्णालयातील घडत असलेला गैरकारभार दररोज उघडकीस येत आहे
याबाबत आज येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले. याबाबतचे डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन ‘लोकमत’च्या हाती आले आहे. पाच दिवसांपूर्वीच राज्यात होत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, काळाबाजार यामुळे नागरिकांची होणारी तारांबळ लक्षात घेता यावर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने सर्व कोविड रुग्णालयांना रुग्णांना आवश्यक इंजेक्शनची यादी रोजच्या रोज संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मागवण्याचे आदेश दिले होते. परंतु पटेल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यासंबंधी यादीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगितले गेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या यादीत पटेल रुग्णालयाचे नावच नाही.
येथील निवासी मुख्यवैद्यकीय अधिकारी हे सुट्टीवरअसून याबाबत येथील इतर अधिकारी व कर्मचारी माहिती देत नाहीत.
गैरव्यवहारांचा आरोप
सामाजिक कार्यकर्ते शिरीष अगुरेड्डी म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये मोठा गैरव्यवहार सुरू असून कोरोनाच्या नावाखाली येथील प्रशासन काळे कारनामे झाकत आहेत. माझ्या नातेवाईकाला इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले होते. परंतु ते कुठेही उपलब्ध नाही. रुग्णालयाला औषध पुरवठा करणाऱ्या रोहिणी मेडिकलकडे विचारले असता ते म्हणाले की, आमच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा केला नाही, डॉ. गायकवाड फोन केला असता उचलताही नाहीत आणि व्यवस्थापकीय प्रमुखही फोन उचलत नाही.