भिगवण : शासनाने कोरोना विषाणू रोखण्यासाठी गंभीर पावले उचललेली आहेत. जिल्हा बंदीचे आदेश काढल्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. यासाठी सोलापूर वरून पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कोंढार चिंचोली पुलाजवळील रस्ता बंद करण्यासाठी करमाळा पोलिसांनी तो जेसीबीने खोदल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने एका वृद्धाचा जीव गेल्याची घटना गुरूवारी घडली. कोंढार चिंचोलीचे रहिवासी शिवाजी सोपान डफळे (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी डफळे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेची हकीगत अशी, की सोलापुर जिल्हातील कोंढअर चिंचोली येथील रहिवाशी शिवाजी डफळे यांना गुरूवारी हृदय विकाराचा झटका आला. त्यांना रूग्णवाहिकेने उपचारासाठी भिगवण येथील आयसीयु सेंटर येथे आणले जात होते. दरम्यान, कोरोनाबंदीमुळे जिल्हा बंदीचे आदेश दिल्यामुळे वाहने अडवण्यासाठी करमाळा पोलीसांनी कोंढार चिंचोली आणि भिगवण गावच्या सीमेवरील रस्ता जेसीबीच्या साह्याने खोदून ठेवला. या खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे रूग्णवाहीकेला भिगवण येथे येण्यास उशीर झाला. दरम्यान घटनेचे गार्भीय ओळखून डॉक्टरांनी रूग्णवाहिकेतच त्यांना प्रार्थमिक उपचार देण्यास सुरूवात केली. तसेच भीगवण येथून दुसरी गाडी मागवली. ती गाडी आल्यानंतर डफळे यांना उचलून खड्यातून त्या गाडीत बसवून भिगवण येथील दवाखान्यात आणण्यात आले. मात्र, तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना लवकर दवाखान्यात आणले असते तर त्यांचा प्राण वाचला असता असे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. शासनाने पोलिसांना कोरोनावरती प्रतिबंध करण्यासाठी विशेष अधिकार दिले आहेत. याबरोबरच संचारबंदी जमावबंदी सारखे कायदे देखील लागू केले आहेत. मात्र, गाड्या अडवण्यासाठी त्यांनी थेट रस्ताच खोदल्यामुळे एका व्यक्तीला या मुळे प्राण गमवण्याची वेळ आली. ..........................महत्वाचा आणि वर्दळीचा रस्ताभिगवण हे गाव मोठे आहे. मोठी बाजारपेठ आणि दवाखाने असल्याने नागरिक या ठिकाणी येत असतात. सोलापूर जिल्हातील अनेक नागरिक चांगल्या उचारासाठी या ठिकाणी येत असतात. अनेक गर्भवती महिला, आणि रूग्ण याच मार्गाचा वापर करत असतात. जिल्हा बंदी करण्यासाठी रस्ता न खोदता केवळ बॅरिगेट्स लावले असते, तर या रूग्णाचा जीव वाचला असता. यामुळे डफळे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न नातेवाईक विचारत आहेत.
सोलापूरहून पुणे जिल्ह्यात प्रवेश बंदीसाठी रस्ता खोदल्याने रूग्णाचा मृत्यू; भिगवण येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 7:20 PM
हृदय विकाराचा झटका आल्यानंतर मिळाले नाहीत वेळेवर उपचार
ठळक मुद्देभिगवण हे गाव ; महत्वाचा आणि वर्दळीचा रस्ता