पुणे : पुण्यातील मुक्तांगणच्या व्यसनमुक्ती केंद्रात अनाेख्या पद्धतीने हाेळी साजरी करण्यात आली. स्वतःतील स्वभाव दाेषांची हाेळी करत व्यसनातून मुक्त हाेण्याच्या घाेषणा देण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून हाेळीच्या दिवशी असा उपक्रम राबविण्यात मुक्तांगणमध्ये राबविता येताे.
पुण्यातील विश्रांतवाडी भागात मुक्तांगण व्यवसनमुक्ती केंद्र आहे. या व्यसनमुक्ती केंद्रातून आत्तापर्यंत शेकडाे रुग्ण बरे हाेऊन त्यांनी आपले नवीन आयुष्य सुरु केले आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातही तरुणांची संख्या अधिक आहे. व्यसनातून लाेकांना मुक्त करण्याचे काम मुक्तांगण व्यवसनमुक्ती केंद्राद्वारे करण्यात येते. या केंद्रात हाेळी अनाेख्या पद्धतीने साजरी केली जाते. यंदा हाेळीच्या मुहूर्तावर पेशंट आणि येथील कर्मचाऱ्यांनी आपल्यातील स्वभाव दाेष एका कागदावर लिहीले. ते सर्व कागद गाेळा करुन त्याची हाेळी करण्यात आली. सर्वांनी आपल्यातील स्वभाव दाेष कागदावर लिहून ते स्वतःतून कायमचे काढून टाकण्याचे ठरवले. यावेळी विविध घाेषणा देखील देण्यात आल्या.
मुक्तांगणचे दत्ता श्रीखंडे म्हणाले, दरवर्षी आम्ही मुक्तांगणमध्ये हाेळी साजरी करत असताे. यंदा आम्ही एका कागदावर स्वतःतील स्वभाव दाेष लिहीले. त्यात अनेकांनी आपण उगाचच राग राग करत असल्याचे, बायकाेवर विनाकारण चिडत असताे असे स्वभावातले दाेष लिहीले. ते आम्ही एकत्र करुन त्याची हाेळी केली. तसेच विविध घाेषणाही दिल्या. या उपक्रमात केवळ पेशंटच नाही तर येथील कर्मचारी देखील सहभागी झाले. हाेळीत आम्ही आमच्यातील स्वभाव दाेषांचे दहण केले आणि सकारात्मक विचारांचा स्विकार केला.