लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : धायरीत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव पाळीव कोंबड्यांपुरताच मर्यादित आहे. या कोंबड्या नष्ट करण्यासाठी गेलेल्या पथकाला स्थानिकांचा विरोध झाल्याने शनिवारी (दि. ५) पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येणार आहे.
नांदेड सिटी येथील नाला ओलांडल्यानंतर एक वस्ती आहे. तिथे काही कुटुंबातील पाळीव कोंबड्या अकस्मात मृत झाल्या. त्या तपासणीसाठी नेल्यानंतर त्यांना बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे नियमानुसार १ किलोमीटरच्या परिघातील सर्व पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या नष्ट करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे पथक तिथे गेले होते. मात्र स्थानिक नागरिकांकडून त्यांना विरोध झाला. बरेचजण अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून आले. त्यामुळे आता शनिवारी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई होणार आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. शीतल मुकणे यांनी सांगितले की, धायरीतील एकाही पोल्ट्रीमधून कोंबड्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद नाही. फक्त ‘त्या’ वस्तीमधील घरांमधील पाळीव कोंबड्यांमध्ये ही लागण झालेली आहे. परिसरातील सर्व कोंबड्यांची संख्या सुमारे साडेतीनशे आहे. या सर्व कोंबड्या शनिवारी शास्त्रीय पद्धतीने नष्ट केल्या जातील.