तळेगाव दाभाडे : येथील मायमर मेडिकल कॉलेज व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील कामगारांचा विविध मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप शनिवारी चिघळला. यामुळे उपचार थांबवून सर्वच रुग्णांना बाहेर काढण्याचा निर्णय व्यवस्थापनाला घ्यावा लागला. अतिदक्षता विभागातील १० जणांना इतर रुग्णालयात हलविले. सध्या इथे एकही रुग्ण नाही. रुग्णांना वाऱ्यावर सोडून संप करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.पुणे जिल्हा भारतीय मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून संप सुरू केला आहे. रुग्णालय प्रवेशद्वारावर त्यांनी शनिवारी निदर्शने केली. कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, एकही कर्मचारी कामावर यायला तयार नसल्याने रुग्णसेवेवर याचा विपरीत परिणाम होऊ लागला. तपासणीबरोबरच औषधे द्यायलाही अनेक अडचणी येऊ लागल्या. संप मिटण्याची शक्यता नसल्याचे पाहून व्यवस्थापनाने अखेर रुग्णांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यानंतर सकाळपासून रुग्णांना बाहेर जा असे सांगण्यास सुरूवात केली. यामुळे रुग्ण व नातेवाईक भांबावून गेले; पण उपचारच होत नसल्याचे पाहून व पुढेही उपचार होऊ शकणार नसल्याचे लक्षात आल्याने रुग्णांनीही बाहेरचा रस्ता धरला. साहजिकच हाताला लावलेल्या सलाईनच्या सुया, बँडेजसह सोबत आणलेले अंथरुण पांघरून घेऊन बाहेर पडताना रुग्णांची अवस्था केविलवाणी झाली होती.राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवून संपास पाठिंबा दर्शविला. दरम्यान, सोमवार पर्यंत तोडगा निघाला नाही तर मंगळवारी सकाळी वडगाव फाटा येथे रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
रुग्ण वाऱ्यावर; कर्मचारी संपावर
By admin | Published: June 15, 2014 4:23 AM