पुणे : सोलापूर येथील ब्रेनडेड झालेल्या युवकाच्या मातेने आपल्या मुलाच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतल्याने पुणे आणि पिंपरी येथील चार रुग्णांना संजीवनी देणारा ठरला आहे. दात्या युवकाचे अवयव सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काढण्यात (रिट्रायव्हल) आले.सोलापूर येथील डॉ. वैंशपायन शासकीय रुग्णालयातील मूत्रपिंड विकारतज्ज्ञ डॉ. संदीप होळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षांचा युवक बिदरच्या बसवकल्याण तालुक्यातील रहिवाशी होता. त्याचा ११ सप्टेंबर रोजी रस्त्यावर अपघात झाला होता. सोलापूरच्या डॉ. वैंशपायन रुग्णालयात दाखल केल्यावर तो ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यानंतर येथील डॉक्टर आणि वैद्यकीय समाजसेवकांनी त्या युवकाच्या नातेवाईकांना अवयवदानासाठी समुपदेशन केले असता त्यांनी संमती दिली. त्यानुसार त्यांनी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीला (झेडटीसीसी) कळवले.समितीकडे असलेल्या वेटिंगवरील रुग्णांच्या यादीनुसार त्याचे हृदय आणि यकृत (लिव्हर) हे रुबी हॉल क्लिनिक येथील दोन रुग्णांना देण्याचे ठरले. तर एक मूत्रपिंड (किडनी) हे पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय तर दुसरे मूत्रपिंड हडपसरच्या नोबेल रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात येणार असल्याची माहिती पुणे झेडटीसीसीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
ब्रेनडेड युवकाच्या अवयवांमुळे रुग्णांना नवसंजीवनी, अवयव दान, पुणे व पिंपरी-चिंचवड येथील चौघांना उपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 3:37 AM