तळेघर : तळेघर (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जयेश बिरारी यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही व त्यांचा तालुक्याच्या गावात जाताना वाटेत मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या, ते तळेघरमध्ये निवासी नाहीत त्यामुळे आरोग्य केंद्राकडे पूर्णत: दुर्लक्ष होते आदी आरोप करत त्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी व त्यांची बदली करावी या मागणीसाठी आखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी अत्यंत डोंगरदऱ्या खोऱ्यांमध्ये वसली आहेत या भागामध्ये राहणारा आदिवासी बांधव हा अत्यंत गरीब आहे. या भागातील आदिवासी जनतेचा आरोग्य विषय प्रश्न कायमचा मिटावा यासाठी गेले कित्येक वर्षांपासून तळेघर, तिरपाड, आडिवरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र काढण्यात आले. परंतु ह्याच भागातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे या भागामध्ये आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. विशेषत: तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर डॉक्टर असूनही नसल्यासारखे चित्र असल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. असा आरोपही किसान सभेचे सचिव अशोक पेकारी यांनी केला.
किसान सभेच्या वतीने यावेली विविध मागण्या केल्या त्यामध्ये तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन डाॅक्टर असावे व त्यातील किमान एक तरी डाॅक्टर निवासी असावे, तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जयेश बिरारी हे दोन मृत्यूस जबाबदार धरून त्यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी चौकशी दरम्यान त्यांना निलंबित करावे. डॉ. बिरारी यांच्या विविध तक्रारी केल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावरही कारवाई करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या वेळी आखिल भारतीय किसान सभा अध्यक्ष कृष्णा वडेकर, सचिव अशोक पेकारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती धोंडू केंगले, शंकर मोहंडुळे, तळेघर सरपंच चंद्रकात उगले, पांडुरंग कोंढवळे, अशोक जोशी, मच्छिंद्र वाघमारे, रामदास लोहकरे, सुभाष भोकटे, गणेश काटळे, महेश गाडेकर, दीपक रढे, नंदा मोरमारे, लक्ष्मी आढारी, लिला मेमाणे, आशा कावळे यावेळी उपस्थित होते.
कोट -
तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवास्थाने नाहीत. दुर्गम भाग असल्यामुळे येथे भाड्याने खोलीही मिळत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकिय अधिकाऱ्यांची दोन पदे असताना एकाचीची नियुक्ती केली गेली आहे, त्यामुळे एकट्यावरच कामाचा ताण येतो. डॉक्टरही माणूस आहे त्यामुळे रात्रंदिवस २४ तास काम करणे शक्य होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रतिबंधात्मक सेवा दिली जाते. ज्या महिलेचा व बाळाचा उपचार मिळाला नाही म्हणून जीव गेल्याचा आरोप केला जातो त्या महिलेलाही प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देण्यात आली होती. त्यांना अतिदक्षता विभागाची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात रेफर केले होते.
- डाॅ. जयेश बिरारी, वैद्यकीय अधिकारी, तळेघर