पुणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयांमधील खाटांची उपलब्धता लक्षात घेऊन लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ‘गृह विलगीकरणा’चा पर्याय देण्यात येत असून घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतू, या रुग्णांना पालिकेच्या कोविड केअर सेंटरमधून आवश्यक औषधे उपलब्ध करुन दिली जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. नाईलाजास्तव नागरिकांना मेडिकल्स किंवा खासगी रुग्णालयांमधून औषधे खरेदी करावी लागत आहेत.शहरातील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 7 हजार 393 झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. एकूण सक्रिय रुग्णांच्या तुलनेत हा आकडा 50 टक्के आहे. पालिकेच्या कोविड सेंटरमधून स्वाब रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ज्यांच्याकडे घरात राहून उपचार घेणे शक्य आहे अशांना घरीच उपचार घेण्यास परवानगी देण्यात येते. त्याकरिता स्थानिक आरोग्य निरीक्षकांकडून पत्र घ्यावे लागते. स्वाब तपासणी केंद्रावरुन या रुग्णांना घरी पाठविताना मेडीकल कीट देणे आवश्यक आहे. परंतू, अनेक रुग्णांना हे मेडीकल कीट दिले जात नाही. त्यांना फॅमिली डॉक्टरला दाखवून त्यांच्याकडून औषधे घेण्यास किंवा खासगी रुग्णालयातून औषधे घेण्यास सांगितले जात आहे. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एकीकडे हे रुग्ण घरीच राहून उपचार घेत असल्याने पालिकेच्या यंत्रणेवरील ताण कमी होत आहे. तरीदेखील काही वैद्यकीय अधिकारी हे कीट देण्यात हात आखडता घेत आहेत. कोविडची औषधे काही ठराविक मेडीकल्समध्येच मिळतात. त्याची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालिकेच्या सेंटरमधून औषधांचे कीट न मिळाल्याने या मेडीकल्ससह खासगी रुग्णालयांमधून ही औषधे खरेदी करावी लागत आहेत.=चौकट=सर्व कोविड सेंटर्सवर गृह विलगीकरणात राहणा-या रुग्णांना औषधे पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. व्हिटॅमिन सी, मल्टी व्हिटॅमिनसह आर्सेनिक अल्बम, आवश्यकतेनुसार अॅन्टीबायोटीक्स आदी औषधांचे कीट दिले जात आहे. एखाद दुस-या ठिकाणी चुकून असा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. या औषधांच्या कीटचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
पुण्यात ‘गृह विलगीकरणा’तील रुग्णांना मिळेना मेडीकल कीट; नागरिकांकडून तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 9:08 PM
खासगी रुग्णालयांमधून घ्यावे लागतात औषधे
ठळक मुद्देशहरातील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 7 हजार 393 झाली