पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किडनीशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरली जात असताना सामान्य नागरिकांच्या तुलनेत किडनीच्या आजाराच्या रुग्णांनी दुपटीने विशेष काळजी घेण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. ‘उपचारापेक्षा प्रतिबंध बरा’ हा सल्ला दिला जात आहे.
कोरोनाग्रस्त व्यक्तींमध्ये ७५-८० टक्के प्रमाण सहव्याधी असलेल्या रुग्णांचे आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि किडनी विकार यांसारखे आजार असलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे पहिल्यापासून सांगितले जात आहे. कोरोना विषाणूचा नवा ‘व्हेरीयंट’ थेट प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. त्यामुळे सहव्याधी असलेल्या रुग्णांना झपाट्याने आणि तीव्र संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणूनच किडनीचा विकार असलेले आणि डायलिसिस सुरू असलेल्या रुग्णांनी जास्त सतर्क राहणे गरजेचे असते.
कोरोना विषाणूचा किडनीवर संसर्ग होतो. त्यामुळे रक्तप्रवाहात गुठळ्या तयार होतात आणि या गुठळ्यांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो व किडनीचे कार्य सुरळीत होत नाही. किडनीच्या पेशींमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते, असेही एका संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे किडनी विकाराच्या रुग्णांनी सौम्य लक्षणे जाणवली तरीही दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावेत, असे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चौकट
कोरोनाचे एकूण रूग्ण - ४ लाख ७४ हजार २९९
बरे झालेले रूग्ण - ४ लाख ६२ हजार ९२९
सध्या उपचार घेत असलेले रूग्ण - २ हजार ८८८
एकूण मृत्यू - ८ हजार ४८२
चौकट
किडनीचा रूग्ण ‘पॉझिटिव्ह’ आल्यास
“कोरोनाग्रस्त अथवा संशयित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी. चाचणीचा अहवाल येण्याची वाट न पाहता तातडीने विलग व्हावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरुन न जाता मानसिक स्थिती खंबीर राखावी. स्वतःहून गृह विलगिकरणात राहण्याचा हट्ट धरू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढील प्रक्रिया पार पाडावी.”
चौकट
“किडनी विकार असलेल्या रुग्णांनी शक्यतो कोरोना होऊ नये, यासाठीच जास्तीत जास्त काळजी घ्यावी. विलंब न करता लवकरात लवकर लसींचे दोन्ही डोस पूर्ण करावेत. मधुमेह आणि रक्तदाब संतुलित राहील याची काळजी घ्यावी. संतुलन राखल्यास कोरोना झाला तरी तो सौम्य स्वरूपाचा असू शकतो. कोरोना झाल्यास पहिले तीन-चार दिवस दुखणे अंगावर काढून नंतर ऑक्सिजन पातळी घसरली की उपचारांसाठी धावाधाव सुरू होते. अशी परिस्थिती उद्भवू देऊ नये. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच स्टेरॉइड्सचे प्रमाण ठरवू द्यावे. कोरोनामुळे मूळ आजार आणखी बळावला तर डायलिसिस फ्रिक्वेन्सी वाढू शकते. मात्र, योग्य उपचार घेतल्यास फ्रिक्वेन्सी नियंत्रणात राहते. कोरोना झाला तरी डायलिसिसच्या सायकलमध्ये खंड पडू दिला जात नाही.”
- डॉ. अच्युत जोशी, किडनीविकारतज्ज्ञ