पुणे : राज्यात आतापर्यंत काेराेनाच्या (ओमायक्राॅन) बीए. २.७४, बीए. २.७५ आणि बीए. २.७६ या नव्या व्हेरिएंटचे ७५ रुग्ण आढळले असून, ते सर्व घरच्या घरी बरे झाले आहेत, ही बाब दिलासादायक आहे.
काेराेनाच्या मूळ विषाणूत बदल हाेऊन त्याचे अल्फा, डेल्टा, ओमायक्राॅन हे उपप्रकार तयार झाले. त्यापैकी डेल्टा हा घातक हाेता. इतर व्हेरिएंट कमी तापदायक आहेत. यापैकी ओमायक्राॅनच्या व्हेरिएंटमध्येही आणखी बदल झाले असून, त्याद्वारे बीए. ४ व बीए. ५ हे दाेन व्हेरिएंट समाेर आले. त्यानंतर आता बीए. २.७४, बीए. २.७५ आणि बीए. २.७६ हे नवे उपप्रकार आढळून आले आहेत, अशी माहिती राज्याचे साथराेग अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे यांनी दिली.
या तीन व्हेरिएंटचे निदान पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयाेगशाळेत करण्यात आले. या प्रयाेगशाळेत पुणे, मुंबई व विदर्भ येथून १२५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले हाेते. त्यापैकी ७५ नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांना साैम्य लक्षणे हाेती, अशी माहिती बीजे प्रयाेगशाळेचे प्रमुख डाॅ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली. या ७० रुग्णांपैकी बीए. २.७५ चे २० रुग्ण नागपूर विभागातील आहेत. याच व्हेरिएंटचे १० रुग्ण पुण्यात आढळले हाेते.
पुण्यात ९४५ नवे रुग्ण
पुण्यात शनिवारी काेराेनाचे ९४५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे ग्रामीणमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवीन पैकी १५९ रुग्ण हे पुणे ग्रामीण, ५६६ पुणे शहर तर २२० रुग्ण पिंपरी-चिंचवडचे आहेत. पुणे शहर, पिंपरी व ग्रामीणमध्ये मिळून ६ हजार ३७१ रुग्ण सक्रिय आहेत.