सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण दररोज ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. सध्या ससूनमध्ये विविध विभागातील आयसीयूमध्ये १२३ बेड उपलब्ध असून, व्हेंटिलेटर केवळ ६१ आहेत. रुग्णांची मोठी संख्या लक्षात घेता आयसीयूसाठी सध्या रुग्ण ‘वेटिंग’वर असून, जास्तीत जास्त रुग्णांना न्याय देताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आवाक्याबाहेर गेली आहे. व्हेंटिलेटरवरील उपचारांचा खर्च रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाइकांना परवडत नाही. यामुळे राज्यातून प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपºयांतून सर्वसामान्य रुग्ण मोठ्या प्रमाणात ससून रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी दाखल होतात. ससून रुग्णालयामध्ये सध्या ट्रॉमा सेंटर, एमआयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू आणि सीव्हीटीएस हे सर्व विभाग मिळून १२३ बेड उपलब्ध आहेत, तर व्हेंटिलेटर केवळ ६१ आहेत. ससून रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेता तातडीने किमान १०० व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे.स्वाइन फ्लू व अन्य साथीच्या आजारांनी थैमान घातला आहे. अशा रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटरची खूप आवश्यकता असते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उपलब्ध असलेल्या आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरचा उपयोग करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने वेटिंग लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार प्रथम येणाºया रुग्णास प्राधान्य दिले जाते; परंतु अशा परिस्थितीत अचानक एखादा गंभीर रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यास प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. यामुळे प्रशासनाने जास्तीत जास्त व्हेंटिलेटर मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये काही आमदार, खासदारांनी आपल्या निधीच्या माध्यमातून व्हेंटिलेटरसाठी ससून निधी उपलब्ध करूनदेखील दिला आहे.
‘आयसीयू’साठी रुग्ण ‘वेटिंग’वर, प्रशासनाची कसरत; १२३ बेड, तर व्हेंटिलेटर फक्त ६१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:52 AM