पुणे : शहरात मोबाईल कंपन्या, गॅस कंपन्या, महावितरण यांच्याकडून वारंवार होत असलेल्या खोदाईपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी खोदाईमुक्त तंत्रज्ञानाचा वापर करून सेवावाहिनी टाकण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे खोदाईमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा मार्ग मोकळा झाला असून याकामी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. आॅक्टोबर महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.महापालिकेच्या वतीने खोदाई मुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या सहा कंपन्यांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी खोदाई न करता सेवा वाहिन्या टाकण्याची चाचणी करून दाखविली. या वेळी मोबाईल कंपन्या, महावितरण, गॅस कंपन्या यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितले, ‘‘खोदाईमुक्त तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्यांनी जमिनीमध्ये छेद घेऊन मशिनीच्या साह्याने सेवा वाहिनी टाकण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. महावितरण, गॅस कंपन्यांना सेवा वाहिनी टाकण्यास अवघड जाणाऱ्या ठिकाणीही याची चाचणी घेतली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून केला जात आहे.’’ मोबाईल कंपन्यांकडून इंटरनेटची ४ जी सेवा कार्यान्वित केली जात असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली होती. त्याचबरोबर पुढील वर्षभरात आणखी खोदाई करण्याचे नियोजन आहे. रस्ता खोदाई करताना रहदारीस अडथळा, राडारोडा, वाहने घसरणे, धुळीचा नागरिकांना होणारा त्रास यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे खोदाईचे निश्चित धोरण ठरविण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने करण्यात येत होती. (प्रतिनिधी)
खड्ड्यांपासून होणार सुटका
By admin | Published: August 09, 2016 1:58 AM