पुणे : शिक्षण क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीतील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायण पूजेचा वाद अजूनच वाढला आहे. कॉलेज आणि विद्यार्थी संघटनेत सत्यनारायण पूजा करण्यावरून झालेल्या वैचारिक संघर्षात आता पतित पावन संघटनेने उडी घेतली असून त्यांनी मंगळवारी फर्ग्युसनच्या प्रवेशद्वारावर सत्यनारायण पूजा घातली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील आठवड्यात महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये शुक्रवारी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आल्याचे परिपत्रक गुरूवारी काढण्यात आले होते. त्यानुसार मुख्य इमारतीमधील प्रवेशाच्या विभागामध्ये सत्यनारायण पूजेचा धार्मिक विधी करण्यात आला. राज्यशासनाने सरकारी कार्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक विधी करण्यास पूर्णत: मनाई केली आहे. जून २०१७ मध्ये काढलेल्या एका परिपत्रकामध्ये सर्व शासकीय संस्थांमधील देव-देवतांचे फोटो सन्मानाने बाहेर काढण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुजेवर तीव्र आक्षेप नोंदवत आंदोलन केले होते. त्यानंतर आज महाविद्यालय प्रशासनाला पाठिंबा म्हणून पतित पावन संघटनेतर्फे पूजा घालण्यात आली.
पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक म्हणाले की, अनेक संघटना फक्त हिंदूंच्या सणाला आक्षेप घेतात. मात्र यापुढे असे झाल्यास त्यांना आमच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले जाईल. लोकतांत्रिक जनता दलाचे सरचिटणीस कुलदिप आंबेकर यांनी या विषयावर बाजू मांडली असून ते लोकमतशी बोलताना म्हणाले की, राज्यघटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे पतित पावन संघटनेला माझा विरोध नाही. मात्र महाविद्यालय परिसरात कोणी पूजा करत असेल तर मात्र आमचा कायम विरोध राहील.