बारामती : आपल्या मुलाचा वाढदिवसाचा कोण आनंद आई- वडिलांना असतो! चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आई-वडिलांना काय करु आणि काय नको, असे झालेले असते. मात्र वाढदिवसाच्या सोहळ्यातच विषारी सापाने दर्शन दिल्यास सर्वांचीच पाचावर धारण बसते. असाच काळ बारामतीतील पाटोळे कुटंबीयांनी अनुभवला. तीन वर्षांच्या राजवीरचा पाय अत्यंत विषारी घोणस सापावर पडणारच होता. मग पुढील अनर्थ काय झाला असता हे सांगायलाच नको होते. मात्र, राजवीरच्या वडिलांनी वेळीच ते पाहून राजवीरला उचलल्याने ‘काळ आला होता’ म्हणण्याची वेळ आली होती. बारामती-तांदूळवाडी रस्त्यावरील शिवनेरी बंगल्याच्या मागे राहत असलेल्या पाटोळे कुटुंबीयांनी शनिवारी (दि. ३०) काळ अनुभवला. कुटुंबातील सागर पाटोळे यांच्या ३ वर्षाचा मुलगा राजवीर याच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ सुरु असताना अचानक घरात साडेपाच फूट अतिविषारी घोणस साप शिरल्याचे आढळले. त्यामुळे सगळ्यांची बोलती बंद झाली. बारामती-तांदूळवाडी मार्गावर पाटोळे कुटुंब भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबातील राजवीरचा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू होती. पाहुणे मंडळी, शेजारी, बच्चेकंपनी केक कापण्यासाठी गोळा झाले होते. अचानक संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधार झाला. त्याचवेळी वडिलांबरोबर गाडीवरुन काही वेळ बाहेर गेलेला राजवीर वडिलांसोबतच घरी परतला. राजवीर घरात जात असताना त्याचा सापावर पाय पडणारच होता. मात्र, गाडीच्या उजेडात वडील सागर यांना साप दिसला. त्यांनी राजवीरला जोरात हाका मारत थांबविले. तसेच, क्षणाचा विलंब न करता राजवीरला उचलून घेतले. दुसºया दारातून घरात जात सगळ्यांना बाहेर काढले. याच दरम्यान वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर घोणसचा रौद्र अवतार सर्वांनी पाहिला. शेजारी राहणाºया वंदना आलगुडे यांनी सर्पमित्र अमोल जाधव यांना कळविले. घोणस साप घरातील पाईपला वेटोळे मारून बसल्याने सर्पमित्र अमोल यांना सापाला पकडण्यासाठी २० मिनिटे लागली. सापही लवकर ताब्यात येत नव्हता. जोर जोरात तोंडातून शिट्टीसारखा आवाज काढत फुत्कारत होता असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अमोल यांनी आपल्या अनुभवाचा वापर करीत शिताफीने साप पकडत बरणीत बंद केला. अखेर सुमारे अर्धा - पाऊण तास चाललेला हा थरारक क्षण संपला. मोठे संकट टळल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मोठे संकट टळल्याची भावना व्यक्त केली. ...........४राजवीरच्या वाढदिवशीच असा थरारक क्षण आल्याने त्याच्या आजीचे डोळे पाणावले होते. राजवीरच्या आई कोमल यांना तर सापाच्या भीतीने रात्रभर झोप लागली नाही, आज सकाळपासूनी त्या अंगणात भीतीने वावरत होत्या, असे सांगितले. .........हा साप पूर्णवाढ झालेला घोणस जातीचा असून याची लांबी साडेपाच फूट आहे. या सापाच्या विषाला ‘हिमोटॉक्सिस’ म्हणतात. तसेच हा साप अजगरासारखा दिसत असल्याने अनेक वेळा लोक त्याला पकडायला किंवा त्याच्याजवळ जातात. साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत. साप निघाल्यास सर्पमित्र यांच्याशी संपर्क करावा.- अमोल जाधव , ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन-बारामती........
चिमुकल्याच्या वाढदिवसालाच पाटोळे कुटुंबीयांनी अनुभवला ‘काळ’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 2:45 PM
तीन वर्षांच्या राजवीरचा पाय अत्यंत विषारी घोणस सापावर पडणारच होता
ठळक मुद्देवडिलांच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली