पुणे : राजदत्त अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी म्हणायचे, की त्यांच्या कादंबऱ्यांची पटकथा करताना फार काही करावेच लागत नाही. त्यांच्या कादंबऱ्यांतील संवादलेखन आणि दृश्यात्मकता पटकथेसारखीच असते. अण्णा भाऊंचा हा गुण सुरेश पाटोळे यांच्या कादंबऱ्यांत उतरला आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वच कादंबऱ्यांचे चित्रपट होऊ शकतात. या अर्थाने पाटोळे अण्णा भाऊंचे वाङ्मयीन वारस आहेत, असे विचार ज्येष्ठ समीक्षक विश्वास वसेकर यांनी मांडले.यशोदीप पब्लिकेशन्स प्रकाशित व सुरेश पाटोळे लिखित ‘पुळका’ या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार होत्या. कादंबरीचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते झाले. पुळका ही रंजकतेच्या अंगाने जाणारी कादंबरी असली तरी अंजनही घालते. लेखनात वास्तवता आहे. सोडलेल्या, गाळलेल्या जागाही आहेत. त्या भरता भरता वाचकही कादंबरीकार होतो, असेही वसेकर म्हणाले.सुनीताराजे पवार म्हणाल्या, समाजापासून दुरावत आपण एकांताच्या गुहेकडे वाटचाल करत आहोत. त्या दृष्टीने लेखकांना कादंबरी दिशादर्शक आहे. कार्यक्रमाचे संयोजन मसाप विश्रांतवाडी-येरवडा शाखेतर्फे करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
पाटोळे हे अण्णा भाऊंचे वाङ्मयीन वारस
By admin | Published: January 14, 2017 3:35 AM