पिंपरी : महापालिकेत स्थायीसह विधी, क्रीडा, शिक्षण मंडळ आदी विभागांमध्ये पत्नीच्या कामकाजात पतीराज लुडबूड करीत असल्याचे लोकमतने ३ एप्रिलच्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रकाशित केले होते. याचा परिणाम म्हणजे झालेल्या स्थायी समिती सभेच्या वेळी अँटिचेंबरमध्येही दर मंगळवारी बसणारे सदस्यांचे पतीराज गायब झाले होते. स्थायी समितीसह विधी, क्रीडा, शिक्षण मंडळ आदी समित्यांच्या बैठकीपूर्वी होणाऱ्या चर्चेत, तसेच बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत महिला सदस्यांचे पतीराज लुडबूड करीत असल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला होता.या वृत्ताची सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आणि मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत, शिक्षण मंडळ, विधी, क्रीडा समिती सदस्यांच्या बैठकीवेळी चर्चा होती. चिंचवड, पिंपरी, भोसरी विधानसभा मतदारसंघातील कोण-कोण सदस्य असावेत, याविषयीची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. महापालिकेच्या विविध मजल्यांवर नेहमी दिसून येणारे पतीराज गायब झाल्याचे दोन दिवस दिसून येत आहे. पतीराजांची लुडबूड तात्पुरती थांबली म्हणून काही महिला नगरसेवकांनी सुस्कारा सोडला. पतीराजांच्या लुडबुडीला काहीसमिती सदस्यही वैतागलेले होते. मात्र, याबाबत कोणीही सदस्य अवाक्षरही काढत नव्हते. तूर्त तरी नगरसेविकांच्या चमकू पतीराजांची लुडबूड थांबल्याने काही सदस्यांनी लोकमतला धन्यवाद दिले.(प्रतिनिधी)
पतीराजांची लुडबूड थांबली
By admin | Published: April 08, 2015 3:46 AM