प्रसाद कानडेपुणे : नळस्टॉप ते पौड रस्त्यांवर उड्डाणपूल आहे. पीएमपीच्या बसची संख्यादेखील पुरेशी आहे. असे असतानादेखील या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नाही. त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे ह्या रस्त्याचेच नियोजन झाले नाही. मग वाहतुकीचे नियोजन कसे होणार? १९९० पासून कोथरूडसह परिसराच्या विकासाला सुरुवात झाली. मात्र, केवळ इमारती उभारल्या त्या तुलनेत रस्त्याचा विकास झाला नाही. रस्ते वाढले नाहीत, अंतर्गत रस्त्याचा प्रश्नदेखील गंभीर आहे.
पौड रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक कोंडी चांदणी चौक येथे होते. आता त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यास आणखी बराच वेळ लागणार आहे. बावधन, मुंबई व साताराकडे जाणाऱ्या तिन्ही रस्ते येथे एकत्रित येतात. त्यामुळे ह्या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती दूर करण्यासाठी आता काम सुरू झाले आहे; मात्र ते पूर्ण होण्यास आणखी बराच काळ जावा लागणार आहे. यासह ह्या मार्गावर अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. यात भुगांव, पिरंगुट, शिंदेवाडी, पौड, कोथरूड यांचा समावेश आहे.
उड्डाणपूलचे नियोजन चुकले :
पौडफाटा चौक येथून सुरू होणाऱ्या उड्डाणपूलचे नियोजन चुकले आहे. त्यामुळे त्याचा फारसा फायदा झालेला नाही. ज्यावेळी ह्या पुलाचे विषय चर्चेला आला त्यावेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा पूल गरवारे कॉलेज येथून सुरू होईल व त्याचा शेवट केळेवाडीच्या चौकात असेल याचे नियोजन होते. त्याला मंजुरीदेखील मिळाली होती; मात्र निधीच्या प्रश्नामुळे उड्डाणपुलाची सुरुवात गरवारे महाविद्यालय येथून न होता आताच्या एसएनडीटी समोरून झाली आहे. त्यावेळी सुचविण्यात आलेले उड्डाणपूल हे वाय आकाराचे होते. यातली एक बाजू कोथरूडकडे जाणारी, तर दुसरी बाजू पौडकडे जाणारी असे त्याचे नियोजन होते. मात्र, त्याला मान्यता मिळाली नाही.