लोणावळा, दि. 28 - मावळ व पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणारे मावळ तालुक्यातील पवना धरण आज 95 टक्के भरल्याने धरणातून 2750 क्यसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मागील तीन दिवसांपासून धरणाच्या हैड्रो गेटद्वारे 1400 क्युसेक्स पाणी वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत होते.
मात्र धरण 95 टक्के भरल्याने व पावसाचा जोर कायम असल्याने आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास धरणाचे चार दरवाजे अर्धा फूट उघडून 1350 क्युसेक्सने पाणी पवना नदीपात्रात सोडण्यात आले. तत्पूर्वी खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन. एम. मठकरी, पवना अभियंता मनोहर खाडे व ग्रामस्तांच्या उपस्थितीमध्ये पवना जलाशयाचे पुजन करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त व समाधानकारक पाऊस झाल्याने आठ दिवस अगोदरच धरण फुल झाले असून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असल्याचे खाडे यांनी सांगितले. धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याने पवना नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागील वर्षी 5 आँगस्ट रोजी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
उपविभागीय अभियंता मठकरी म्हणाले पवना धरणाची पाणी साठवण क्षमता ही 10.78 टीएमसी एवढी आहे. मात्र मजबुतीकरणा अभावी धरणात 1.10 टीएमसी कमी म्हणजेच 9.68 टीएमसी ऐवढाच पाणीसाठा ठेवला जातो. यापैकी 8.60 टीएमसी ऐवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाचे मजबुतीकरण झाल्यास यामध्ये जवळपास 1.60 टीएमसी एवढा पाणीसाठा वाढू शकतो. मागील २ वर्षात निधी अभावी धरणावर दुरुस्तीबाबतची काहीच कामे झाले नाहीत. यावर्षी मात्र जवळपास साडेचौदा कोटी रुपये निधी येणार असल्याने त्यामधून धरण सुरक्षेची कामे, ड्राँक ट्रेच्या दुरुस्तीची कामे व धरणाशी निगडीत इतर कामे करण्यात येणार आहेत. तसेच धरणात होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी धरणाला सुरक्षा जाळी लावण्यात येणार आहे.