विश्वास मोरे/ लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शहर परिसरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. नदीकाठी गावे, शहरे वसली, वाढली. नदीला आई म्हणूनही संबोधिले जाते. मात्र, निगरगट्ट शासकीय व्यवस्था आणि संवेदनाशून्य राज्यकर्ते यांच्यामुळे आईकडे दुर्लक्ष होत आहे. शासकीय पातळीवर नदी स्वच्छतेबाबत अनास्था असताना ‘आपले चिंचवड व्यासपीठा’च्या वतीने चिंचवड परिसरातून जाणारी पवना नदी दत्तक घेतली आहे. नमामि पवनामाई उपक्रमांतर्गत नदी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. नदी संवर्धनाच्या उपक्रमात अखिल चिंचवडकर उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी. यंत्र, तंत्रज्ञाननगरी. इंद्रायणी आणि मुळा या नद्या शहराच्या सीमेवरून जातात, तर पवना नदी शहराच्या मध्यभागातून जाते. आघाडी आणि युती सरकारने नदीसुधार कार्यक्रम गुंडाळला आहे. त्यामुळे नद्याच्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. जीवनदायिनी ठरणाऱ्या या नद्या गटारगंगा झाल्या आहेत. नदी प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील जमिनींना सोन्याचा भाव आल्याने नदीत राडारोडा आणि भराव टाकून पात्रही अरुंद होऊ लागले आहे. याकडे महापालिका प्रशासन किंवा राज्य शासन यांचे लक्ष नाही. लालफितीच्या कारभाराच्या अनास्थेमुळे चिंचवडमधील नागरिकांनी पुढाकार घेऊन आपले चिंचवड हे व्यासपीठ स्थापन केले आहे. पावसाळ्यानंतर पवनामाई अर्थात नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साचते. त्यामुळे डासांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने गंगा नदीचे पावित्र्य आणि महत्त्व आपले चिंचवड हे व्यासपीठाच्या वतीने ‘नमामी पवनामाई, संकल्प पवनामाई संवर्धनाचा, उचलूया खारीचा वाटा...’ या उद्देशाने चिंचवड गावठाण ते केजुदेवी बंधाऱ्यापर्यंतची नदी दत्तक घेतली आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नमामी पवनामाई अभियानाच्या प्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले, ‘‘चिंचवडगावात पवना नदीतीरावर महासाधू मोरया गोसावी यांची समाधी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. धनेश्वर पूल ते केजूदेवी बंधाऱ्यापर्यंतचे पात्र दत्तक घेतले आहे. याच भावनेतून आपले चिंचवड व्यासपीठ निर्माण केले आहे. लोकसहभागातून हा उपक्रम सुरू आहे. नदीपात्रातील अडथळे, पुलाचे काम झाल्यानंतर राहिलेला राडारोडा, गाळ, जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. पोकलेन, जेसीबी, डंपरच्या माध्यमातून गाळ काढला जात आहे. तसेच पाण्यावर तरंगणारी जलपर्णीही काढण्यात येत आहे. नदीपात्र स्वच्छ, सुंदर व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. संकल्प पर्यावरण रक्षणाचा, उचलूया वाटा खारीचा या संकल्पनेतून लोकसहभागातून काम सुरू आहे. त्यात चिंचवडकरांनी सहभागी व्हावे.’’एकजुटीने भारल्यावानी, तुफान आलंया...महाराष्ट्रातील अनेक भागातील पाण्याचे दुर्भीक्ष पाहता पाणी फाउंडेशनने खड्डे खोदाई पाणी साठवणूक होण्यासाठी श्रमदानाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे नदीचे सौंदर्य कायम राहावे, यासाठी नदीस्वच्छतेचा उपक्रम आपले चिंचवड व्यासपीठाने हाती घेतला आहे.‘एकजुटीने भारल्यावानी नदी स्वच्छतेचे तुफान आलंया...’ याचा अनुभव चिंचवडला येत आहे. नागरिक एकजुटीने नदी स्वच्छता मोहिमेत दर रविवारी उतरत आहेत.
पवनामाईला घेतले दत्तक
By admin | Published: May 08, 2017 2:39 AM