बारामती : बारामतीत आयुर्वेदीक महाविद्यालया पाठोपाठ कॅन्सर हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. एमआयडीसी परीसरात नियोजित कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी शुक्रवारी(दि १३) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीने महत्वकांक्षी असलेला हा आरोग्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण असा प्रकल्प आहे. पवार यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस राज्य परिवहन मंडळ, एमआयडीसी, वैद्यकीय शिक्षण व अर्थ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बारामतीत कॅन्सर हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
पश्चिम महाराष्ट्राला बारामती मध्यवर्ती असे हे रुग्णालय असणार आहे. नगर, सातारा, सोलापूर, पुणे व कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने बारामती मध्यवर्ती आहे. बारामतीतील कॅन्सर हॉस्पिटल या सर्व जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती असेल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत नमूद केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेची जागा नियोजित कॅन्सर हॉस्पिटलसाठी संपादीत करण्याचे नियोजित आहे. उपमुख्यमंत्री पवार यांची या जागेच कॅ न्सर रुग्णालय उभारण्याची संकल्पना आहे. एसटी कार्यशाळेसाठी एमआयडीसीमध्ये तितकीच जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असून वैद्यकीय महाविद्यालयाशेजारील सध्याची कार्यशाळेची जागा कॅन्सर हॉस्पिटलसाठी हस्तांतरीत करण्याबाबतही चर्चा झाली. अजित पवार यांनी सर्व संबंधित वरिष्ठ अधिका-यांना या बाबत आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर येथे हॉस्पिटल उभारणीसाठी प्रकल्प अहवाल तयार होणार आहे. या पार्श्वभुमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी या हॉस्पिटल उभारणीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनासोबत अगोदरच चर्चा सुरु केली आहे. त्या दृष्टीने येत्या काही दिवसात कॅ न्सर रुग्णालयाचा आराखडा तयार होईल.