पुणे : जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक ते होळकर पुलादरम्यानची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका व कॅन्टोन्मेंट प्रशासनाने रस्ता रुंदीकरणावर भर दिला होता. मात्र, खडकी रेल्वे स्थानकासमोरील एका चित्रपटगृहाच्या जागेच्या मोबदल्यासंदर्भातील प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यावर जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील एका हॉटेल व चित्रपटगृहाच्या भूसंपादनाला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविली आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जुन्या मुंबई पुणे रस्त्याचा बोपोडी चौक ते किर्लोस्कर कंपनी या दरम्यानचा ८०० मीटर भाग पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो, तर किर्लोस्कर कंपनी ते होळकर पुलापर्यंतचा उर्वरित दोन किलोमीटरचा भाग खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत आहे. खडकी रेल्वे स्थानकासमोरील जयहिंद चित्रपटगृहाची जागा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ९९ वर्ष भाडेकराराने घेण्यात आली होती. मात्र, त्यात एक हॉटेलदेखील चालविले जात होते. मेट्रो प्रकल्प व पुणे, मुंबई जुन्या महामार्गावरील रस्ता रुंदीकरणामध्ये संबंधित चित्रपटगृह येत होते.
कॅन्टोन्मेंटने रस्त्यासाठी जागा दिली; मात्र चित्रपटगृहाचे मूल्यांकन न करता ती जबाबदारी महापालिकेवर टाकली. अखेर महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चित्रपटगृहाचे मूल्यांकन केले. त्यानुसार या इमारतीपोटी चित्रपटगृहाच्या मालकांना महामेट्रोमार्फत नुकसानभरपाई दिली जाईल, असे निश्चित करण्यात आले होते. हे मूल्यांकन मान्य नसल्याने पंजाब हॉटेलचे संचालक महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. चित्रपटगृहाचे संचालकही या याचिकेत प्रतिवादी होते. उच्च न्यायालयाने या भूसंपादनाला स्थगिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाने मूल्यांकन केल्यानुसार मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश देतानाच भूसंपादनावरील स्थगिती उठविली. महापालिकेच्या वतीने ॲड. अभिजित कुलकर्णी आणि पुणे कॅन्टोंन्मेटच्यावतीनेही त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार निशा चव्हाण यांनी दिली. पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर हेदेखील न्यायालयात उपस्थित होते.
रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्यामुळे पंजाब हॉटेल आणि जयहिंद चित्रपटगृहासमोरील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण यापूर्वीच करण्यात आले आहे. केवळ येथील भूसंपादनामुळे काम रखडल्याने या मार्गावरील वाहतूक खडकी बाजार येथून वळविण्यात आल्याने वाहतूक संथ होऊन कोंडीत भर पडत होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर करून रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे.