रावेत : येथील पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याने आजूबाजूच्या भागात डासांनी हैदोस घातला आहे. नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे ही समस्या उद्भवली आहे.या नदीच्या प्रदूषणाची तीव्रता आणखी वाढून नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. संपूर्ण नदीपात्रच जलपर्णीने आच्छादले आहे. नदीच्या पात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठून राहिल्यामुळे केवळ डासांचीच निर्मिती होत नसून, एकाच जागी साठलेले दूषित पाणी व त्यातील जलपर्णीमुळे दुर्गंधी पसरली आहे. उग्र अशा दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . डास आणि दुर्गंधी अशा दुहेरी त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येकडे आरोग्य विभागाचे अनेक वेळा लक्ष वेधूनही नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. वाढलेल्या जलपर्णीमुळे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. आजूबाजूच्या परिसरात पसरलेल्या डासांमुळे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. नदीपात्रात सोडले जाणारे दूषित पाणी रोखण्याची कोणतीही यंत्रणा प्रशासना कडे उपलब्ध नाही. (वार्ताहर)
जलपर्णीमुळे पवना नदी प्रदूषित
By admin | Published: January 13, 2017 2:51 AM