Uddhav Thackeray: विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करत आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 03:28 PM2021-11-02T15:28:35+5:302021-11-02T15:28:48+5:30
चांगल्या कामात अथडळा आणणे ही आपली संस्कृती नाही
बारामती : महाविकास आघाडीचे मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर अटक करण्यात आली आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे आघाडी आणि पवार कुटुंबियांवर विरोधी पक्षाकडून टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर 'विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करत असल्याचे' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. बारामतीत इक्यूबेशन सेंटरच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदर सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, मी कधी डगमगलो नाही, आणि पुढे कधी डगमगनार नाही. विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करते. राजकारणात अनेकांचे एकमेकांशी पटत नाही, त्यामुळं चांगल्या कामात अथडळा आणणे ही आपली संस्कृती नाही. आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. मात्र शिवसेनाप्रमुखांची (Balasaheb Thackeray) आणि पवार साहेबांचे मैत्रीचे सबंध होते. अनेकवेळा शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरदबाबू जे करतायेत ते बघायला हवे. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांना घेऊन मी एकदा बारामती पहायला येणार आहे. विकासाच्या बारामती देशातील सर्वोत्तम केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
बॉम्ब फोडा पण धूर काढू नका
दिवाळीनंतर बॉम्ब फोडतो म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवत टोला लगावला. बॉम्ब फोडा पण धूर काढू नका कारण कोरोना अजून गेला नाही. अस म्हणत त्यांनी फडणवीस खिल्ली उडवली. तसेच, पवार कुटुंबाचे ठाकरे यांनी कौतुक केले.