राजगुरुनगर : शरद पवार हे अनेक योजनांचे जनक आहेत. १९७२ च्या दुष्काळात ‘फूड फॉर हंगर’ घोषणेने स्वाभिमान दुखावल्याने त्यांनी बारामतीत ‘फूड फॉर वर्कर’ हा प्रयोग राबविला. त्यातून पुढे रोजगार हमी योजना जन्मास आली. १९९० च्या बीजिंग आॅलिंपिक स्पर्धेत कबड्डी स्पर्धेस प्रवेश देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘घर तेथे संकरित गाय’ ही योजना त्यांनी प्रत्यक्षात राबवून श्वेतक्रांती घडविली. अशा अनेक योजनांचे शरद पवार हे जनक आहेत, असे प्रतिपादन सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केले.हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या ‘लोकनेते शरदरावजी पवारसाहेब : संसदीय कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव’ या विषयावरील ज्ञानदीप वार्षिक विशेषांक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील होते. याप्रसंगी आमदार सुरेश गोरे, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक कोंडीभाऊ टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, सुशील शिंगवी, डॉ. रोहिणी राक्षे, अश्विनी मोरमारे, किसन गारगोटे, उमेश आगरकर, सुभाष टाकळकर, अॅड. माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, मुरलीधर खांगटे, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते.दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता अभ्यास, करिअरवर लक्ष केंद्रित करावे.या वार्षिक अंकाचे संपादन डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. जी. जी. गायकवाड यांनी केले.
पवार हे अनेक योजनांचे जनक : वळसे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 1:00 AM