पिंपरी : संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांनी पिंपरीतील पवार टोळीवर आणि निगडीतील जाधव टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई केली. पिंपरी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये टोळीप्रमुख अविनाश राकेश पवार (वय २८), संतोष उत्तम चौगुले (३०), यश बाबू गरुड (१८), निसार मोहम्मद शेख (२५), रेणुका मारुती पवार (३६), ज्ञानेश्वर ऊर्फ माउली राजेंद्र पाटील (२७, सर्व रा. दत्तनगर, चिंचवड), रंजना उत्तम चौगुले (५२, रा. मोहनगनर, चिंचवड) यांचा समावेश आहे. या टोळीवर ११ गुन्ह्यांची नोंद आहे.
निगडी पोलिसांनी केलेल्या मोकाच्या कारवाईमध्ये टोळीप्रमुख जितेंद्र आनंदा जाधव (वय २३), आकाश ऊर्फ बबूल दत्ता मोरे (१९), अमन समीर शेख, विधिसंघर्षित बालक (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांचा समावेश आहे. या टोळीवर सात गुन्ह्यांची नोंद आहे.
दोन्ही टोळ्यांतील सदस्यांनी स्वतःची संघटित टोळी तयार करून अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने, तसेच स्वतःच्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला. घातक हत्यारे बाळगून दहशत निर्माण केली. खुनी हल्ला, दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, दुखापत, कट रचणे, तोडफोड करणे, विनयभंग करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे या टोळ्यांवर दाखल आहेत. त्यांच्याविरोधात मोकाच्या कारवाईचे आदेश अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली पिंपरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलक, निगडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल देवडे, पोलिस अंमलदार सोनटक्के, ओंकार बंड, सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पोलिस आयुक्तांचा ९८ जणांना ‘मोका’
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. यात २०२४ मध्ये १८ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ९८ गुन्हेगारांवर ‘मोका’ची कारवाई झाली आहे.