पुणे : “भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करून भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभारलेल्या भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार व्हीसीद्वारे बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हीसीद्वारे), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितीत होत्या. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, या केंद्राच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांतील भूजलाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यामुळे विविध कारणांसाठी वाढलेल्या पाण्याच्या मागणीचे योग्य व्यवस्थापन शक्य होईल. गुलाबराव पाटील म्हणाले, “पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून त्याचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे.” डॉ. कलशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. साळवे यांनी आभार मानले.