पुणे: गृहमंत्री अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य तेच करत आहेत. त्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर थेट भाष्य करणे टाळले. सर्व प्रकरणाची तसेच आरोपांचीही शहानिशा होऊ द्यावी असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारदेखील चांगलेच कोंडीत सापडले आहे. विरोधकांनी तर थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. राजेश टोपे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी परमबीर सिंग आणि अनिल देशमुख प्रकरणावर भाष्य केले.
टोपे म्हणाले, मला एवढंच वाटतं की, याबाबतीतला तपास सुरु आहे. काही आरोप झाले आहेत त्याबाबत पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करत त्या आरोपांमागची सत्यता आपण तपासली पाहिजे.
टोपे यांना त्यांचे नाव गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चेबाबत पत्रकारांनी यावेळी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना टोपे यांनी मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच वक्तव्याचा हवाला दिला.
दरम्यान,कोणत्याही विषयावर अंतिम निर्णय पवारच घेतात असेही त्यांनी स्पष्ट केले. टोपे म्हणाले आणि कोणत्याही पार्टी मध्ये शेवटी पक्षाध्यक्ष जे योग्य वाटतं तेच करत राहतात. पवार साहेब जे करायचे ते योग्य करतात. “