पुणे : महाविकास आघाडीमध्ये छगन भुजबळ यांनी मंत्रीपद देण्याचे निश्चित झाले आहे. कुठले मंत्रीपद असेल याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. याबाबतची माहिती भुजबळ यांनी पुण्यात दिली. समता पुरस्कार प्रदान साेहळ्यासाठी ते आले हाेते. यावेळी बाेलताना आपल्या मनाेगतात त्यांनी येवलेकरांचे व त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मागे उभे राहिलेल्यांचे आभार मानले. तसेच शरद पवार यांनी आपला राजकीय पुनर्जन्म केला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी समता पुरस्काराचे वितरण करण्यात येते. पुण्यातील फुले वाड्याच्या प्रांगणात हा साेहळा आयाेजित करण्यात येताे. भुजबळ यांनी स्थापन केलेल्या समता परिषदेच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात येताे. यंदा हा पुरस्कार फादर दिब्रिटाे यांना भुजबळ यांच्य हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आपल्या मनाेगतात त्यांनी आपल्याला अडचणीच्या काळात साथ दिलेल्यांचे आभार मानले.
भुजबळ म्हणाले, लाेकांचे मी आभार मानताे. माझ्या अडचणीच्या काळात अनेकजण माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांचे उपकार मी कधीच विसरु शकणार नाही. मला पुन्हा एकदा निवडूण दिल्याबद्दल येवल्याच्या जनतेचे मनापासून आभार. मी आज हाेणाऱ्या शपथविधी साेहळ्यात मंत्री म्हणून शपथ घेणार आहे. कुठले मंत्रिपद असेल ते नंतर ठरविण्यात येणार आहे. मंत्रीपदाची संधी देऊन शरद पवारांनी माझा राजकीय पुनर्जन्म केला आहे.
महाविकास आघाडीबाबत बाेलताना ते म्हणाले, आम्ही आघाडी करताना जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या, महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करुन एक समान कार्यक्रम ठरविला. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचा आमच्या एकसुत्री कार्यक्रमामध्ये समावेश केला आहे.