पुणे : डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार होते. त्यांच्याच मंत्रिमंडळाने ज्या नक्षलवादी संघटनांवर बंदी घातली, त्याच संघटनांवर आमच्या सरकारच्या काळात कारवाई झाली. ज्या व्यक्तींविरोधात आमच्या सरकारने कारवाई केली त्यांच्या विरोधात २००७ आणि २०११ मध्येही नक्षलवादाच्या आरोपावरुनच कारवाई झाली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच गृहमंत्री राज्यात होते. त्याच संघटना आणि व्यक्तींविरोधात भाजपाच्या काळात कारवाई झाली की आम्ही जातीयवादी कसे ठरतो, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला.ते म्हणाले, सोईस्कर भूमिका घेत पवारांनी पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची करू नये. कारवाई फक्त एल्गार परिषदेमुळे नव्हे तर पूर्व इतिहास तपासून पुराव्यांनंतर झाली.
तसेच महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबत शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. अवकाळीग्रस्त शेतकºयांना या कर्जमाफीचा एक पै चाही फायदा नाही. तसेच सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत विरोधकांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत केली. एका विवाह समारंभाच्या निमित्ताने फडणवीस रविवारी कोल्हापुरात आले होते. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करतो अशी घोषणा करणाºयांनी ‘यू टर्न’ घेतला आहे.