पुणे : पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. खरे तर, राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार हे एका व्यासपीठावर आले होते. यावेळी, बोलायला उभे राहिल्यानंतर, शरद पवारांनी भाषणाची सुरवात करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यास पीठावर असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्याकडे लागले होते. यावेळी बोलायला उभे राहिल्यानंतर, शरद पवार यांनी "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार" असे म्हणत भाषणाला सुरुवात केली.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करीत पुन्हा उपमुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेतले. तसेच पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितल्याने आता हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत गेले आहे.
पवार स्टेजवर, आम्ही आंदोलनात यात गैर काय? - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र मोदींविरोधी आंदोलनात सहभागी हाेणार असल्याने नेमके चालले काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
- शरद पवार हे राजकारण, समाजकारण यात कधीही गल्लत करत नाहीत. पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्हाला यात काही गैर वाटत नाही, असे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.